अठरा वर्षे भरले शेजाऱ्याचे वीजबिल
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील एक वीजग्राहक केन विल्सन यांनी आपल्या शेजाऱ्याचे वीजबिल आपलेच समजून 18 वर्षे भरले, अशी घटना समोर आली आहे. हे त्यांनी शेजाऱ्यावर उपकार म्हणून केले नाही, किंवा त्याला साहाय्य व्हावे म्हणूनही केलेले नाही. तर ते ज्या वीजकंपनीचे ग्राहक आहेत, त्या कंपनीच्या चुकीमुळे असा प्रकार घडला आहे. आता तो उघडकीस आल्याने या कंपनीने त्यांची क्षमायाचना केली असून त्यांना झालेल्या हानीची भरपाई करण्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीने तपास केल्यानंतर या प्रकारावर प्रकाश पडला.
पण हे घडले कसे आणि विल्सन यांच्या ते लक्षात कसे आले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण सामान्यत: सर्व वीजग्राहक वीजबिल आणि वीजमीटर यांच्यावर लक्ष ठेवत असतात. मीटरच्या आकडेवारीनुसार बिल येते की नाही, हे पाहतात. काही गडबड आढळल्यास किंवा वीजबिल वाजवीपेक्षा जास्त आल्यास ते त्वरित वीजकंपनीकडे तक्रार करुन मीटर दुरुस्त करुनही घेतात.
विल्सन यांच्यासंदर्भात असे घडले होते, की त्यांनी एका इमारतील सदनिका घेतली आणि राहण्यास प्रारंभ केला. काही काळानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांचे वीजबिल वाजवीपेक्षा जास्त येत आहे. त्यांनी बिल कमी करण्यासाठी वीजेचा उपयोग कमी केला. तरीही उपयोग होईना. मग त्यांनी वीजेच्या उपयोगाचा मागोवा घेणारे एक उपकरण आणून बसविले. त्या उपकरणाचा ब्रेकर बंद झाल्यानंतरही त्यांचा मीटर चालत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कंपनीकडे तक्रार केल्यानंतर तपासणी झाली. त्यात असे आढळून आले की त्यांच्या शेजाऱ्याचे बिल काही तांत्रिक घोटाळ्यामुळे त्यांच्या बिलामध्ये जमा होत आहे. हा प्रकार त्यांच्या लक्षात आधी आलाच नव्हता. जेव्हा शेजाऱ्याने वीजेचा उपयोग वाढवला आणि त्याचे बील अधिक प्रमाणात येऊन लागले त्यावेळी विल्सन यांना काहीतरी घोटाळा होत असल्याचा संशय आला, अखेरीस कंपनीने आपली चूक मान्य केली आणि भरपाई करुन देण्याचे आश्वासन दिले. असा प्रकार भारतात घडला तर फारसे कोणाला आश्चर्य वाटले नसते. पण अमेरिकेतही असे घडू शकते बाब निश्चितच आपल्याला आश्चर्यकारक मानावी लागणार आहे.