ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने अठरा लाखांची फसवणूक
वडगावच्या महिलेला सायबर गुन्हेगारांचा दणका
प्रतिनिधी / बेळगाव
ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट नफा मिळवून देण्याचे सांगून वडगाव येथील एका महिलेला सायबर गुन्हेगाराने 18 लाख रुपयांना ठकवले आहे. यासंबंधी शहर सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वझे गल्ली, वडगाव येथील सुनयना बेनके यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 9 मे रोजी त्यांना एक कॉल आला होता. इक्विटी शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा मिळेल, असा विश्वास देण्यात आला. त्यांच्यावर विश्वास ठेवून 14 मे रोजी त्यांनी 50 हजार रुपये गुंतवणूक केली.
वेबसाईटवर नफा दिसत होता, मात्र तो काढण्यासाठी तुम्हाला आणखी गुंतवणूक करावी लागणार, असा सल्ला सायबर गुन्हेगारांनी दिल्यामुळे 14 जूनपर्यंत त्यांनी एकूण 18 लाख रुपये गुंतविले आहेत. नफा तर नाहीच, गुंतवलेली रक्कमही मिळाली नाही. म्हणून आपण फसलो गेलो, याची त्यांना कल्पना आली. सीईएन पोलीस पुढील तपास करीत आहेत.