तीन रुग्णांच्या तात्काळ बायपास सर्जरीसाठी आठ युवकांचे रक्तदान
युवा रक्तदाता संघटना ठरली हक्काची ब्लड बँक
ओटवणे प्रतिनिधी
गोवा बांबोळी रुग्णालय आणि पडवे लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये तातडीच्या बायपास सर्जरीसाठी दाखल असलेल्या तीन रुग्णांना फ्रेश ८ ब्लड बॅगची गरज असताना युवा रक्तदाता संघटनेच्या युवा रक्तदात्यांनी तात्काळ बांबोळी आणि पडवे गाठत रक्तदान केले. त्यामुळे युवा रक्तदाता संघटना पुन्हा एकदा गरजू रुग्णांसाठी हक्काची ब्लड बँक ठरली असून रक्तापलीकडचे नाते जपणाऱ्या या संघटनेसह सर्व रक्तदात्यांचे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले.गोवा-बांबोळी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या गुरुनाथ नाईक (आरोस) यांना A पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रक्ताची गरज असताना जीवन सावंत (माजगाव) आणि गोपाळ गोवेकर (सावंतवाडी) यांनी तात्काळ बांबोळी रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. तसेच याच रुग्णालयात दाखल असलेल्या गितांजली घाडी ( तळकट) या महिलेला बायपास सर्जरीसाठी A पॉझिटिव्ह रक्तगटाची गरज असताना गौरव कुडाळकर (सावंतवाडी) यांनी त्वरीत त्या ठिकाणी जात रक्तदान केले. दरम्यान पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये बायपास शस्त्रक्रियेसाठी एका रुग्णाला O पॉझिटिव्ह रक्तगटाच्या ५ युनिट रक्ताची तातडीने आवश्यकता असताना संदीप निवळे, संदेश नेवगी, वसंत सावंत, रुझारिओ फर्नांडिस आणि स्टेनली अरान्जो यांनी रक्तदान करून महिलेचे प्राण वाचवले. या तिन्ही रुग्णांच्या नातेवाईकांनी रक्तासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी तात्काळ नियोजन केले. गेल्या अनेक वर्षांपासून युवा रक्तदाता संघटना गरजू रुग्णांसाठी देवदूत ठरत आहे.