पेन्शन उशीरा दिल्यास आठ टक्के व्याज
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लागू केला नवा नियम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
निवृत्ती वेतनाची थकबाकी चुकती करण्यास बँकेने विलंब केल्यास बँकेकडून निवृत्तीवेतन धारकाला 8 टक्के व्याज दिले जाईल, असा नवा नियम भारतीय रिझर्व्ह बँकेने केला आहे. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांना दिलासा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेने या संबंधीची आपली सूचना मंगळवारी प्रसारित केली आहे.
केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन (पेन्शन) संबंधीचे व्यवहार करणाऱ्या बँकांना ही सूचना देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन देण्यात कोणत्याही कारणास्तव विलंब झाल्यास विलंबाच्या कालावधीसाठी आठ टक्क्याने व्याज द्यावे लागेल. बँकेकडून कोणत्याही कारणास्तव विलंब होऊ नये, याकरिता हा नवा नियम बनवण्यात आला असल्याचे बँकेने स्पष्ट केले.
दिनांक चुकवल्यास व्याज
प्रत्येक केंद्रीय किंवा राज्य कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर तो निवृत्तीवेतनास पात्र होतो. त्याच्या निवृत्तीवेतन खात्यात निवृत्तीवेतनाची रक्कम जमा केली जाते. ही रक्कम त्याचे खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेने त्याच्या खात्यावर विशिष्ट दिनांकाच्या आत जमा करायची असते. मात्र, बँकेच्या चुकीमुळे किंवा संबंधित कोणत्याही कारणामुळे निवृत्तीवेतन जमा करण्यास बँकेने वेळ लावल्यास बँकेला आठ टक्के व्याज देणे अनिवार्य ठरणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
कोणत्या दिनांकापासून व्याज...
1 ऑक्टोबर 2008 पासून ज्या निवृत्तीवेतनाची थकबाकी आहे, त्या सर्व खात्यांवर व्याज जमा केले जाणार आहे. तसेच ज्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन जमा करण्यात विलंब झालेला आहे. अशा कर्मचाऱ्याच्या खात्यावर विहित दिनांकापासूनचे व्याज जमा करण्यात येणार आहे. या व्याजाचा हिशेब बँक ज्यावेळी त्याच्या खात्याची प्रक्रिया पूर्ण करेल, त्या दिवशी केला जाणार असून त्वरित व्याजाची रक्कम सदर कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.
निवृत्तांना चांगली सेवा द्या
निवृत्त कर्मचाऱ्यांना बँकांनी चांगली सेवा प्रदान करावी. ज्येष्ठ सेवानिवृत्तांशी सन्मानाने वागावे. त्यांना काही अडचणी असतील तर त्यांच्याशी विनम्रपणे बोलून त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा, अशाही सूचना रिझर्व्ह बँकेने आपल्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व बँकांना केल्या आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांना, विशेषत: वृद्धांना दिल्या जाणाऱ्या सेवेची गुणवत्ता सुनिश्चित असली पाहिजे, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
व्याजाचा नियम कशासाठी...
निवृत्ती वेतन कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात विलंब झाल्यास व्याज द्यावे लागेल, हा नियम बँकांची सेवा सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. व्याज द्यावे लागण्याच्या चिंतेपोटी बँका निवृत्तीवेतन खात्यावर जमा करण्यास विलंब करणार नाहीत. त्यामुळे निवृत्तांना मनस्ताप होणार नाही, असा बँकेचा उद्देश आहे.