कुद्रेमनीत पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला आठ जणांचा चावा
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
बेळगाव, कुद्रेमनी : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने आठ जण जखमी झाल्याची घटना सोमवार दि. 14 रोजी रात्री 9 च्या सुमारास कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथे घडली आहे. जखमींमध्ये दोन महिला, पाच पुरुष व एका मुलाचा समावेश असून जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याने अवघ्या 15 ते 20 मिनिटांत कुद्रेमनी गावात तब्बल आठ जणांचा चावा घेतल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्य काही जणांचा चावा घेण्याच्या प्रयत्नात असताना ग्रामस्थांनी पाठलाग करून पिसाळलेल्या कुत्र्याला ठार केले. प्रभा रवळू पाटील (वय 35), मल्लाप्पा निंगाप्पा पाटील (वय 68, दोघेही रा. रवळनाथनगर-कुद्रेमनी), भरमू जाणबा कालकुंद्रीकर (वय 62, टिळकवाडी गल्ली-कुद्रेमनी) व विठ्ठल बाळू तळवार (वय 13, रा. कट्टणभावी), विठ्ठल गुं. मांडेकर (रा. लक्ष्मी गल्ली, कुद्रेमनी), राम कोतेकर (रा. कट्टणभावी), लक्ष्मी विठ्ठल मांडेकर यांच्यावर जिल्हा रुग्णालयात तर नीळकंठ विलास साखरे (वय 57) यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
सोमवारी रात्री साडेआठच्या दरम्यान शिनोळीच्या दिशेने रामघाट रोडवरून एक पिसाळलेला कुत्रा गावात दाखल झाला. राम कोतेकर (रा. कट्टणभावी) हे कुद्रेमनी गावातील धामणेकर यांच्या घरी आले होते. रवळनाथनगर येथे धामणेकर यांचे घर असून कुत्र्याने पहिल्यांदा कोतेकर यांचा चावा घेतला. त्यानंतर कुत्र्याने गावात प्रवेश करत दिसेल त्याचा चावा घेण्यास सुरुवात केली. सध्या कोतेकर हे कोल्हापूर येथे उपचार करून घेत आहेत. त्यानंतर प्रभा पाटील या रात्रीचे जेवण आटोपून भांडी धुण्यासाठी परसूत आल्या होत्या. त्यांचाही कुत्र्याने चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या. त्याच रस्त्यावर पुढे नीळकंठ साखरे जेवण करून घरासमोर शतपावली घालत होते. त्यावेळी कुत्र्याने त्यांचा चावा घेतला. पुढे विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या दिशेने कुत्र्याने चाल केली. त्या ठिकाणी रात्री भजनाचा कार्यक्रम आटोपून विठ्ठल-रखुमाई मंदिराबाहेर भजनी मंडळ चर्चा करीत बसले होते. त्याठिकाणी कुत्र्याने अचानकपणे मल्लाप्पा नि. पाटील यांचा चावा घेतल्याने त्यांच्या हाताला जखम झाली. यानंतर पुढे विठ्ठल मांडेकर यांचा चावा घेऊन कुत्रा आंबेडकर गल्लीत शिरला. त्यानंतर विठ्ठल तळवार या मुलाला जखमी केले. तेथून पुढे टिळकवाडी गल्लीत कुत्रा आला. येथे भरमू कालकुंद्रीकर घराबाहेर बसले होते. त्यांच्यावर अचानक कुत्र्याने हल्ला केला. त्यांच्या तोंडावर, हातावर जखमा केल्या तर करंगळीच्या बोटाचा लचकाच तोडला. सर्वजण आपापल्या सोयीनुसार तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले. मात्र अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील आठ जणांचा चावा घेतल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्याला वेळीच ठार केले नसते तर जखमींचा आकडा वाढण्याची भीती होती. मंगळवारी कुद्रेमनी ग्रा. पं. अध्यक्ष विनायक पाटील, सदस्य संजय पाटील, विनय कदम आदींनी हॉस्पिटलमध्ये जावून जखमींची विचारपूस केली.
शिनोळीतही चावा?
शिनोळीच्या दिशेने कुद्रेमनी गावात दाखल झालेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांचा चावा घेतल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुद्रेमनी गावात प्रवेश करण्यापूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने शिनोळी परिसरातही पाच जणाहून अधिक जणांचा चावा घेतल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर काही कुत्र्यांवरही पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याचे बोलले जात आहे.