बिहारमध्ये विषारी दारूमुळे आठ जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये पुन्हा एकदा विषारी दारूमुळे घबराट पसरली आहे. छपरा आणि सिवान जिल्ह्यात मद्यपींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. छपरा जिल्ह्यातील मशरखमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जणांची दृष्टी गेली आहे. काही लोक आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय सिवान जिल्ह्यात 6 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलीस अधीक्षक कुमार आशिष या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून माहिती मिळाली आहे. मात्र, या घटनेमागचे खरे कारण तपासणीअंतीच स्पष्ट होणार आहे. यापूर्वी छपरा जिल्ह्यातील मशरखमध्ये विषारी दारूमुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
विषारी दारूची घटना उघडकीस आल्यानंतर सदर ऊग्णालय अलर्ट मोडवर असून ऊग्णालयातील डॉक्टरांना सतर्क करण्यात आले आहे. इब्राहिमपूर हा सिवान जिह्याचा सीमावर्ती भाग आहे. सर्व आजारी लोक मजूर वर्गातील आहेत. ही दारू कुठून आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, दारू पिऊन तब्येत बिघडल्याची माहिती आजारी व्यक्तींनी डॉक्टरांना सांगितल्यानंतर डॉक्टरांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याच्या लक्षणांवर उपचारही सुरू केले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक घटना घडलेल्या इब्राहिमपूर गावात रवाना झाले आहे.