सत्ताधारी गटातील आणखी आठ नगरसेवक अडचणीत
मनपा कर्मचाऱ्याची पोलिसांत तक्रार : पोलिसांकडून चौकशी सुरू
बेळगाव : खाऊ कट्टा प्रकरणी भाजपच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्याची घटना ताजी असतानाच महापालिकेतील एका कर्मचाऱ्याने आपला छळ केल्याप्रकरणी सत्ताधारी गटाच्या दोन नगरसेवकांच्या नावानिशी अन्य सहा अशा एकूण आठ नगरसेवकांविरोधात नागरी हक्क संरक्षण विभागाकडे तक्रार केल्याने आणखी आठ नगरसेवक अडचणीत आले आहेत. या प्रकरणी शहापूर पोलिसांकडून चौकशी सुरू झाली असून शुक्रवारी पोलिसांनी तक्रारदारासह दोन नगरसेवकांची चौकशी केली. शनिवारी चौकशीला पुन्हा हजर राहण्यासाठी सांगून देखील नगरसेवक उपस्थित राहिले नाहीत. उपलब्ध माहितीनुसार याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एफआयआर दाखल करण्याची सूचना केली आहे. तक्रारदार कर्मचारी अनुसूचित जातीचा आहे. त्यामुळे त्याने भाजपच्या आठ नगरसेवकांनी आपल्याला त्रास दिल्याची सविस्तर तक्रार 7 जानेवारी 2025 रोजी महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्याकडे केली होती. मात्र आयुक्तांनी कोणतीच कारवाई न केल्याने त्या कर्मचाऱ्याने 15 दिवसांपूर्वी पुन्हा नागरी हक्क संरक्षण विभागाचे जिल्हा पोलीसप्रमुख रवींद्र गडादी यांच्याकडे तक्रार केली होती.
तक्रारदार कर्मचारी गोवावेस येथील महापालिकेच्या कार्यालयात महसूल निरीक्षक म्हणून कार्यरत होता. त्यावेळी त्यांच्या बदलीसाठी काहींनी प्रयत्न चालविले होते. बदली थांबवितो असे सांगून काही नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केली होती. त्यावेळी फोन पेच्या माध्यमातून कर्मचाऱ्याने पैसे देऊ केले होते. त्याचा पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा कर्मचाऱ्याने केला आहे. त्यानंतर भाजपच्या एका नगरसेवकानेदेखील त्या कर्मचाऱ्याला टार्गेट करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर कर्मचाऱ्याच्याविरोधात मोर्चा काढून त्रास देण्याचा प्रयत्न केला. सध्या तो कर्मचारी महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागात कार्यरत आहे. खाऊ कट्टा प्रकरणी भाजपच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले असतानाच आणखी एक वाद्ग्रस्त प्रकरणात भाजपचे आठ नगरसेवक अडचणीत सापडले आहेत. मनपातील कर्मचाऱ्याने नागरी हक्क संरक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण अधिक चौकशीसाठी शहापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
भाजपच्या नगरसेवकांमध्ये खळबळ
शुक्रवारी दोन नगरसेवकांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली. त्याचबरोबर तक्रारदार कर्मचाऱ्यालाही बोलावून कागदपत्रे सादर करण्याची सूचना करण्यात आली. शनिवारी पुन्हा चौकशीसाठी नगरसेवकांना पोलिसांनी हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र ते नगरसेवक हजर झाले नाहीत. भाजपच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले असतानाच आणखी एक प्रकरण बाहेर आल्याने भाजपच्या नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे.
एफआयआर दाखल करण्याची सूचना
गोवावेस येथील महापालिकेचे कार्यालय शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे हे प्रकरण शहापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहापूर पोलिसांना केली आहे.