For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठशे पन्नास किलोचे आठ लाख

06:45 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
आठशे पन्नास किलोचे आठ लाख
Advertisement

कोणाच्याही आवश्यकतेच्या वेळी निरपेक्ष बुद्धीनेक केलेले साहाय्य पुढे केव्हातरी फळाला येते, अशी सार्वत्रिक भावना आहे. चीनमधील एका शेतकऱ्याने युद्धाच्या वेळी चीनी सेनेला केलेले साहाय्य अशाच प्रकारे त्याला लाभ देऊन गेले आहे.  त्यावर्षी चीनी सैन्य युद्धात गुंतले होते. आपल्या सैनिकांना या शेतकऱ्याने साहाय्य करण्यासाठी त्याच्यापाशी साठविलेले 850 किलो वजनाचे धान्य  देशकार्यात आपले योगदान म्हणून दिले. चीनी सैन्याच्या एका अधिकाऱ्याने या धान्याचा स्वीकार केला. या योगदानाची आठवण म्हणून या शेतकऱ्याला एक हस्तलिखित पावती देण्यात आली. ही पावती या शेतकऱ्याने सन्मानपत्राप्रमाणे जपून ठेवली. आपल्या देशाच्या सैन्याला आवश्यकता होती. तेव्हा आपल्या हातून अत्यल्प प्रमाणात का असेना, ही आवश्यकता पूर्ण झाली, याचे समाधान त्याला वाटत होते.

Advertisement

ही घटना 1947 मध्ये घडली. त्यानंतर या शेतकऱ्याच्या कुटुंबाला त्या पावतीची आठवण राहिली नाही. पण, 1990 मध्ये त्याच्या पुढच्या पिढीने त्याच्या घराची पुनर्बांधणी करण्याचे ठरविले. जुने घर पाडत असताना ही पावती हाती लागली. त्यांनी ती स्थानिक प्रशासनाकडे सुव्यवस्थित ठेवण्यासाठी सुपूर्द केली. त्या शेतकऱ्याने किंवा त्याच्या पुढच्या पिढीने कधीही सरकारकडे या धान्यांचे पैसे मागितले नव्हते. स्थानिक प्रशासनाने या पावतीची पडताळणी केली आणि ती सत्य असल्याचे आढळून आले. तसेच त्यावेळी त्या शेतकऱ्याकडून ते धान्य साहाय्य म्हणून घेतलेले नसून ऋण म्हणून घेतल्याचेही प्रशासनाच्या लक्षात आले. कारण तसा उल्लेख या पावतीत होता. या धान्यरुपी ऋणाची परतफेड करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. प्रशासनाने या कुटुंबाला आठ लाख रुपये परतफेड म्हणून देण्याचा प्रस्ताव संमत केला. या कुटुंबाने या रकमेपैकी एक चर्तुथांश रक्कम माजी सैनिकांना साहाय्य करणाऱ्या एका संस्थेला दान म्हणून दिले आहेत. साधारणत: 80 वर्षांपूर्वी जी पावती मिळाली होती, ती सैनिक स्मारकात ठेवण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.