महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वेर्णात आठ मजुरांना चिरडले, चार ठार

12:29 PM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नशाबाज बसचालकाने बस चढविली झोपड्यांवर : सुदैवाने बसमधील 15 कर्मचारी सुखरुप बचावले,शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला आक्रोश

Advertisement

वास्को : दारूड्या बसचालकाने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वेर्णातील औद्योगिक वसाहतीत चौघा मजुरांचा बळी घेतला, तर चार मजुरांना गंभीररित्या जखमी केले. दारूच्या नशेत झोपड्यांवर बस चढवताना या चालकाने त्या झोपड्यांमधील मजुरांना चिरडले. या झोपड्या रस्त्याशेजारीच होत्या. अपघातात विनोदसिंह राजपूत (44), राजेंद्र महातो (50), रमेश महातो (41) व अनिल महातो (39) या चार मजुरांना जागीच मृत्यू आला. टुणा कुमार (22), दिनेश कुमार सिंग (37), नरेश उर्फ सुरेश सिंग (62)  व राजेशकुमार मंडल (27) हे मजूर गंभीर जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व मृत व जखमी बिहार राज्यातील मोतीहारी येथील आहेत.  बसचालक भरत गोवेकर (52) हा सुध्दा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. काही जखमींना गोमेकॉत तर काही जखमींना मडगावच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा भीषण अपघात शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडला होता. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील कोमोस्कोप कंपनीजवळील वळणावर हा अपघात घडला. रोजनबर्जर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन (जीए 05 टी 4777 ) ही मिनीबस माघारी जात होती. जवळच्याच वळणावर वळण घेताना चालकाचे बसवरील नियंत्रण गेले आणि बस रस्त्यानजीक उभारण्यात आलेल्या झोपड्यांवर चढली.

Advertisement

चारजणांना झोपेतच मृत्यू

येथील तीन झोपड्यांमधून दहा ते बारा मजूर राहात होते. या सर्व मजुरांना बसने चिरडून टाकले. त्यांच्यापैकी काहीजण जागेच होते, तर काहीजण झोपले होते. काहींना झोपेतच मृत्यू आला. एकूण चार मजुरांचा या अपघातात बळी गेला.

चारजण जखमी, एक गंभीर

चार मजूर गंभीर जखमी झाले आहेत. रात्रीची वेळ असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासही बराच वेळ लागला. या झोपड्यांमधील काही मजूर फोनवर बोलत बाहेर फिरत होते. त्यामुळे हे मजूर या भीषण अपघातापासून बचावले. जखमांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गंभीर जखमी झालेल्यांपैकी एका मजुराचे हल्लीच लग्न झाले होते. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

बसमधील 15 कर्मचारी सुदैवाने बचावले

वेर्णा पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी अपघातात सापडलेल्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या बसमध्ये सुमारे 15 कर्मचारी होते. सुदैवाने हे कर्मचारी सुखरूप बचावले. हा रस्ता ओलांडून बस पुढे गेली असती तर त्यांच्याही जीवावर बेतले असते.

बसचालक व कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा नोंद

वेर्णा पोलिसांनी बसचालक भरत गोवेकर (कुठ्ठाळी) याच्याविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हे नोंद केले आहेत. तसेच मजुरांची धोकादायक ठिकाणी राहण्याची व्यवस्था केल्याप्रकरणी पोलिसांनी मेहबूब सुनानी शेख, (रामनगर, कर्नाटक ) तसेच अब्दुल कलान (केरळ) याच्याविरूद्धही गुन्हा नोंद केला आहे. अपघातग्रस्त बस कुर्टी फोंडा येथील नदीम शेख याची असून पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे. या अपघात प्रकरणी पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वेर्णा पोलीस  निरीक्षक मेल्सन कुलासो व इतर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 बाणस्तारीच्या अपघाताची वेर्णात पुनरावृत्ती

शनिवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात चारजणांचा मृत्यू व पाचजण जखमी झाल्याने काही महिन्यांपूर्वी बाणस्तारी गावात पुलावर दारूड्या कारचालकामुळे झालेल्या भीषण अपघाताची आठवण जागी झाली. बाणस्तारीच्या अपघाताचीच वेर्णात पुनरावृत्ती झालेली आहे.

अपघात घडल्यानंतरही दारु पित होता बसचालक

या अपघातात क्षणात होत्याचे नव्हते झाले. पत्र्यांच्या झोपड्या भुईसपाट झाल्या. जखमी आणि मृत मजूर पत्रे व इतर सामानात अडकून पडले होते. अपघातस्थळी मध्यरात्रीच्या सुमारास आक्रोश झाला. काही मजूर व इतर लोकांनी बसचालकाला धारेवर धरले. बसचालक दारू पिऊन तर्र असल्याचे यावेळी उघड झाले. अपघात घडल्यानंतरही बसचालक त्याच ठिकाणी बसून बाटलीतील दारु पित होता. तसेच मजुरांशी अरेरावी करीत होता, अशी माहिती रात्री तेथे उपस्थित असलेल्या मजुरांनी दिली.

 मजुरांचा कंत्राटदार, पोलिसांचा निष्काळजीपणा

या गंभीर अपघाताने कंत्राटदार तसेच पोलिसांचा निष्काळजीपणाही उघड झाला आहे. सदर मजूर त्या ठिकाणी जवळपास वर्षभर राहत आहेत. हे मजूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्याच्या बाजुच्या गटारांवर स्लॅब घालण्याचे काम करीत असतात. मात्र, कंत्राटदाराने अगदी धोकादायक जागेत त्यांच्या राहण्याची सोय केली आहे. अगदी दोन रस्त्यांच्या नाक्यावर रस्त्याच्याकडेलाच या झोपड्या असून या ठिकाणी अपघाताचा धोका होताच. परंतु या धोकादायक गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने निष्काळजीपणा झाल्याचे उघड झाले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article