For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचे आठ मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत

06:44 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचे आठ मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत
Advertisement

आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय स्पर्धकांचे वर्चस्व , आकाश, लोकेश, नरेंद्र, हर्ष यांना कांस्य

Advertisement

वृत्तसंस्था, उलानबातार

येथे सुरू असलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी आपले वर्चस्व राखले असून आठ मुष्टीयोद्ध्यांनी विविध वजन गटात अंतिम फेरी गाठली आहे.

Advertisement

या स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजन गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत विद्यमान विश्वविजेती मीनाक्षी हुडाने थायलंडच्या योदवेरीचा 4-1 अशा गुणफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता सुवर्णपदकासाठी मीनाक्षी हुडा आणि स्थानिक नोमुनदेरी अमगाल यांच्यात लढत होणार आहे.

महिलांच्या 57 किलो वजन गटातील उपांत्य लढतीत भारताची विद्यमान विश्वविजेती जस्मिन लंबोरीयाने उझ्बेकच्या निगीना उक्तामोव्हाचा 3-2 अशा गुणांनी निसटता पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता सुवर्णपदकासाठीच्या अंतिम लढतीत जस्मिनची लढत थायलंडच्या रुनेरोस बरोबर होईल.

पुरूषांच्या विभागात 50 किलो वजन गटातील भारताच्या विश्वनाथने जॉर्डनच्या हुथाफा इशिषचा 5-0 अशा गुणफरकाने एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. विश्वनाथने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानच्या विद्यमान विश्वविजेता आणि मानांकनात टॉपसिडेड सनझार तास्केनबेचा पराभव केला होता. पुरूषांच्या 60 किलो वजन गटातील उपांत्य लढतीत थायलंडच्या सेकादा रुमथेमचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

दरम्यान भारताच्या आकाशने 75 किलो वजन गटात, लोकेशने 85 किलो वजन गटात, नरेंद्र बेरवालने 90 किलो वरील वजन गटात तसेच हर्ष चौधरीने 90 किलो वजन गटात आपली कांस्यपदके निश्चित केली आहेत. उपांत्य फेरीच्या लढतीत 75 किलो गटात उझ्बेकच्या अब्दुरखिमोव्हने आकाशचा 4-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 85 किलो वजन गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत उझ्बेकच्या युलडोशेव्हने भारताच्या लोकेशवर 5-0 असा एकतर्फी विजय नोंदवित सुवर्णपदकासाठीच्या फेरीत प्रवेश मिळविला. 90 किलोवरील वजन गटातील उपांत्य लढतीत ताजिकिस्थानच्या परवेज कारिमोव्हने हर्ष चौधरीचा 4-1 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले.

महिलांच्या 54 किलो वजन गटात भारताच्या प्रितीने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असून तिची लढत चीन तैपेईच्या वेनबरोबर तसेच 60 किलो महिलांच्या वजन गटात प्रियाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असून तिची सुवर्णपदकासाठीची लढत उत्तर कोरियाच्या वॉनशी होणार आहे. तर 70 किलो वजन गटात अरुंधती चौधरी आणि कझाकस्तानची सिदेश यांच्यात सुवर्णपदकासाठी लढत होईल. या स्पर्धेत भारताचे एकूण 8 स्पर्धक विविध वजन गटात अंतिम फेरीत पोहोचले असून त्यामध्ये सहा महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे.

-जस्मिन आणि मीनाक्षी यांची दमदार कामगिरी

-विश्वनाथ, सुरेश, सचिन यांची घोडदौड कायम

-भारताची आठ पदके निश्चित

-आकाश, लोकेश, नरेंद्र, हर्ष यांना कांस्यपदक

Advertisement
Tags :

.