सदाशिवनगर स्मशानभूमीत बसविणार आठ शवदाहिन्या
महानगरपालिका बांधकाम स्थायी समिती बैठकीत निर्णय : स्मशानभूमीत 15 लाखाच्या निधीतून विकासकामे राबविली जाणार
बेळगाव : सदाशिवनगर स्मशानभूमीत शहरातील विविध भागातील नागरिक अंत्यविधी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे स्मशानभूमी आवारात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पत्र्याच्या शेडखाली अंत्यसंस्कार करण्याऐवजी खुल्या शवदाहिनीवर अंत्यसंस्कार केले जावेत यासाठी नवीन आठ शवदाहिन्या बसविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बांधकाम स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी माधवी सारंग राघोचे होत्या.
सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवून त्याला मंजुरी देण्याची मागणी केली. यावेळी प्रामुख्याने सदाशिवनगर स्मशानभूमीतील समस्यांवर नगरसेवक राजू भातकांडे यांनी प्रकाश टाकला. सदाशिवनगर स्मशानभूमीत शहर व परिसरातील विविध भागातील नागरिकांवर अंत्यसंस्कार केले जातात. त्या ठिकाणी विविध सेवाभावी संस्थांनी शेड उभारले आहेत. त्यावर संबंधितांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र महानगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या शेडवर महापालिकेचे नाव नाही. मनपाने कोणतेही काम केले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नवीन शेड उभारून त्यावर मनपाच्या नावाचा उल्लेख करावा.
केवळ पावसाळ्यातच शेडखालील शवदाहिन्यांवर अंत्यसंस्कार केले जावेत. कारण सातत्याने शेडखाली अंत्यसंस्कार केल्यास पत्रे नादुरुस्त बनत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात व हिवाळ्यात मृतदेहांवर बाहेर अंत्यसंस्कार करण्यात यावेत यासाठी मनपाने तातडीने नवीन आठ शवदाहिन्या बसवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार सदर विषयाला मंजुरी देण्यात आली. इतकेच नव्हे तर सध्या सदाशिवनगर स्मशानभूमीत मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे तातडीने ती समस्या दूर करावी. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने स्वच्छतेवरही परिणाम होत आहे. 15 लाखाच्या निधीतून विकासकामे राबविली जाणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉण्ड पेपरवर जागा खरेदी करून घरे बांधलेल्यांना महापालिकेकडून सीसी देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शाहूनगर परिसरातील काहीजणांकडून पळवाट काढत कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवाना व सीसी मिळविले जात आहे. तशा घरांना हेस्कॉमकडून मीटर दिले जात असल्याने बैठकीत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. अनगोळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समुदाय भवन उभारण्यात यावे, असा विषय अध्यक्षांच्या परवानगीने नगरसेवक श्रीशैल कांबळे यांनी मांडला.
आपले तिन्ही विषय टाळल्याने सदस्य आक्रमक
बांधकाम स्थायी समिती बैठकीत स्मार्ट सिटी आणि एलअॅण्डटीचा विषय घेण्याबरोबरच मुस्लीम बांधवांच्या रमजान ईद पूर्वतयारी बाबतचा विषय घेण्याचे पत्रक सदस्य शाहिदखान पठाण यांनी दिले होते. मात्र एलअॅण्डटी आणि स्मार्ट सिटीची स्वतंत्र बैठक बोलाविण्यात येईल. त्यामुळे आजच्या स्थायी समिती बैठकीत हे विषय नकोत, असे विरोधी गटनेत्यांना कळविण्यात आले होते. तर इतर सणाप्रमाणेच रमजान ईद सणाची पूर्वतयारी महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे केली जाते. त्यामुळे तोही विषय टाळण्यात आला. आपण दिलेले तिन्ही विषय विषयपत्रिकेतून वगळण्यात आल्याचा आरोप करत सदस्य शाहिदखान पठाण आक्रमक बनले. त्यांनी ही माहिती उर्वरित उर्दू भाषिक नगरसेवकांना देऊन बोलावून घेतले. त्यानंतर अध्यक्ष व इतर सदस्यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली.