भारत-मॉरिशसमध्ये आठ करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्कार प्रदान
वृत्तसंस्था / पोर्ट लुईस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोन्ही देशांमध्ये आठ महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही एका शानदार समारंभात प्रदान करण्यात आला. या पुरस्काराची घोषणा मंगळवारी त्या देशाचे नेते डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी केली होती.
12 मार्च हा मॉरिशसचा राष्ट्रीय दिन आहे. या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी या पुरस्कारासाठी मॉरिशसचे प्रशासन आणि तेथील जनता यांचे आभार मानले. हा पुरस्कार त्यांना मॉरिशसचे राष्ट्रपती धरमवीर गोखुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मी हा पुरस्कार विनम्र भावनेने स्वीकारतो. हा केवळ माझा नव्हे, तर 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. हा पुरस्कार मी भारतीय नागरिकांना, तसेच मॉरिशसच्या नागरिकांच्या भारतीय पूर्वजांना अर्पण करतो. दोन शतकांपूर्वी भारतातून काही लोक येथे आले आणि त्यांनी हा देश घडविला, तसेच समृद्ध केला. त्या सर्वांचा मला अभिमान वाटतो, अशी भलावण त्यांनी भाषणात केली.
आठ करारांवर स्वाक्षऱ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही देशांमध्ये आठ महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे करार द्विपक्षीय व्यापार आणि सागरी सुरक्षा, तसेच अन्य अनेक क्षेत्रांमधील सहकार्य वाढविण्यासंबंधी आहेत. मॉरिशसच्या ‘विषेश आर्थिक क्षेत्रा’ला संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्याचे उत्तरदायित्व भारताचे आहे, असे उदगार या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. या करारांमध्ये सायबर गुन्हे रोखणे, मनी लाँड्रिंगला आळा घालणे, मध्यम-लघु-अतिलघु उद्योगक्षेत्रात सहकार्य करणे, अशाही करारांचा समावेश आहे.
सागर योजनेचा विस्तार
या संपूर्ण क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि प्रगती व्हावी यासाठी भारत प्रयत्न करीत आहे. मॉरिशस हा आमचा महत्वाचा सहकारी आणि भागीदार आहे. या क्षेत्राची सुरक्षा आणि स्थिरता राखणे महत्वाचे असून हे काम आपण सर्वांनी एकमेकांना सहकार्य करुन करावयाचे आहे. यासाठी आम्ही ‘सागर’ या संकल्पनेवर काम करीत आहोत. आता या संकल्पनेचा विस्तार करण्यात येणार असून या संकल्पनेत हिंदी महासागरातील क्षेत्रेही समाविष्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे आता ही संकल्पना केवळ ‘सागर’ अशी राहिली नसून ती ‘महासागर’ अशी होत आहे, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी बोलताना केले.
अनेक नेत्यांच्या भेटी
बुधवारी त्यांची मॉरिशसच्या अनेक नेत्यांशी चर्चा झाली. या नेत्यांमध्ये माजी नेते प्रविंदकुमार जगन्नाथ यांचा समावेशही होता. या देशाचे विद्यमान नेते डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी त्यांनी द्विपक्षीय विषयांवर प्रदीर्घ चर्चा केली. त्यांनी मॉरिशसच्या विरोधी पक्षनेत्यांशीही काहीकाळ विचारविमर्श केला. भारतीय समुदायाचे काही नेतेही त्यांना भेटले, अशी माहिती देण्यात आली आहे.
भारतीय नौदलाचा सहभाग
मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित सैन्यदल संचलनात यावेळी भारताच्या नौदलानेही भाग घेतला. आपल्या नौदलाच्या सैनिकांनी भारताचा तिरंगा ध्वज हाती धरुन संचालनात भाग घेतला. यातून दोन्ही देशांचे संरक्षण क्षेत्रात असणाऱ्या निकटच्या सहकार्याचे दर्शन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसचे नेते डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्यासह या संचलनाचे निरीक्षण केले. या नंतर दोन्ही नेत्यांनी भारताचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या ‘पब्लिक सर्व्हिस अँड इनोव्हेशन’ केंद्राचे उद्घाटन केले.