ईद-ए-मिलाद शांती-बंधुत्वाचा संदेश देणारा सण
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन : ईद निमित्त शहरात मिरवणुकीचे आयोजन
ईद-ए-मिलाद सण म्हणजे शांती आणि बंधुत्वाचा संदेश आहे. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन हे सर्वधर्मीय शहरात बंधुभावाने राहत जीवन जगत आले आहेत. यापूर्वी गणेशोत्सव काळात ईद-ए-मिलाद मिरवणूक येत होती. त्यामुळे समस्या उद्भवत होती. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून समाज आणि मौलांनांना ईद-ए-मिलाद जो उत्साह आहे, तो काही दिवस आदी साजरा करावा, अशी विनंती समाज आणि मौलानांना करण्यात आली. त्या विनंतीला सर्वांनी मान देत गेल्या तीन वर्षांपासून ईद-ए-मिलादची मिरवणूक काढली जात आहे. त्यामुळे राज्य, देश आणि जगासमोर बेळगावातील हे उदाहरण कायम रहावे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगत ईद-ए-मिलादच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : ईद-ए-मिलाद निमित्त फोर्ट रोड येथे बुधवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, आमदार आसिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासह मौलांना, अंजुमन ए इस्लाम, शिरत कमिटीचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुरुवातीला सर्वांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी ईद-ए-मिलाद सण गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी येत होता. त्यामुळे समस्या निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याकडून समाजाला आणि मौलांना विनंती करण्यात आली. ईदचा जो उत्साह आहे तो काही दिवस आधीच साजरा करावा, अशी विनंती करण्यात आल्यानंतर आमदार आसिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, अंजुमन ए इस्लाम, शिरत कमिटीच्या सदस्यांनी सर्वांना समजावून सांगितले. सदर बाब तितकी सोपी नव्हती.
मात्र गेल्या तीन वर्षांपासून ईद दिवशीच मिरवणूक काढली जात आहे. त्यामुळे राज्य, देश आणि जगासमोर बेळगाव शहराचे हे उदाहरण कायम रहावे. हे असे व्यासपीठ आहे की या ठिकाणी सर्व समाजाचे नेते पहावयास मिळतात. आम्ही सर्वजण एक आहोत. हे या देशाचे मूल्यतत्त्व आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले व त्यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावरील उपस्थितांनीदेखील आपले विचार व्यक्त करत मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर ईद-ए-मिलादची मिरवणूक पिंपळकट्टा येथून सुरू झाली. फोर्ट रोड, मुजावर खूट, सीबीटी, मार्केट पोलीस स्थानक क्रॉस, संगोळ्ळी रायण्णा सर्कल, जिल्हाधिकारी कार्यालय गेट, चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड, यंदे खूट सिग्नल, धर्मवीर संभाजी चौक, फिश मार्केट, ग्लोब सर्कलमार्गे आसदखान दर्गा येथे समाप्त झाली. सकाळपासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. मिरवणूक मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहने पार्कींग करण्यास मनाई करण्यात आली. वाहनांसाठी कॅन्टोन्मेंट पार्किंग, सरदार्स मैदान आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या.