Vishalgad Fort Eid: विशाळगडावर पोलीस बंदोबस्तात ईद, कोर्टाच्या आदेशाचे पालन
विशाळगडसह गजापूर पंचक्रोशीत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता
शाहूवाडी : न्यायालयाचा आदेश व सूचनांचे पालन करत विशाळगडावर ईद शांततेच्या वातावरणात व साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली. सायंकाळी दर्ग्याचे ट्रस्टी इम्रान मुजावर, आयुब कागदी, हैदर मुजावर, माजी उपसरपंच अबुबकर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्बानी देण्यात आली. तत्पूर्वी नऊ वाजता नमाज पठण झाले. मुबारक मुजावर यांच्या खासगी जागेत पडदे लावून कुर्बानी देण्यात आली.
गडाच्या पायथ्यापासून चार किलोमीटरवरील केंबुर्णेवाडी येथून सुरू झालेला पोलीस बंदोबस्त गडाच्या बुरूजापर्यत पहाटेपासूनच तैनात होता. गडाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. उच्च न्यायालयाने सणानिमित्त अटी व शर्ती घालून कुर्बानी देण्यास मान्यता दिल्याने तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
यामुळे जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशाळगडसह गजापूर पंचक्रोशीत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. १ ते १५ जूनअखेर गडावर बंदी आदेश लागू केला आहे. विशाळगडावर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
प्रशासनाची सतर्कता
गेले काही महिने विशाळगड परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. प्रत्येक बाबीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वच बाबींवर विशेष दक्षता घेतली जात आहे.