अंडी, केळी, चिक्की वितरणाची दररोज माहिती द्यावी लागणार!
बेंगळूर : राज्यात पहिली ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या सरकारी व अनुदानित शाळांमधील मुलांना अंडी वितरण केले जात आहे. मात्र, या योजनेत गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण खात्याने अंडी, केळी आणि चिक्की वितरणाची माहिती पीएम पोषण वेबसाईटवर दररोज ऑनलाईनद्वारे सादर करण्याची सूचना दिली आहे. शिक्षण खात्याने मुख्याद्यापकांवर ही जबाबदारी सोपविली आहे. राज्यात अझीम प्रेमजी प्रतिष्ठान (एपीएफ) च्या सहकार्याने आठवड्यातून सहा दिवस शालेय मुलांना अंडी, केळी, शेंगा चिक्की वितरण करण्याची योजना जारी आहे. आठवड्यातून दोन दिवस राज्य सरकार तर उर्वरित चार दिवस हे पदार्थ अझीम प्रेमजी प्रतिष्ठानकडून दिले जात आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यातील 367 शाळांमध्ये एपीएफने योजनेचे मूल्यमापन केले. त्यावेळी 66 शाळांमध्ये अंडी वितरण, अंडीचे सेवन न करणाऱ्या मुलांना केळी वितरित न करता चिक्की वितरण, त्याचप्रमाणे निश्चित केलेल्या वजनापेक्षा कमी वजनाची चिक्की वितरण केल्याचे उघडकीस आले होते. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याने 98 अधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. आता या योजनेमध्ये पारदर्शकपणा आणण्याच्या उद्देशाने शिक्षण खात्याने अंडी, केळी, शेंगा चिक्की वितरणाची माहिती पीएम पोषण या वेबसाईटवर दररोज नोंदविण्याची सूचना शाळांना दिली आहे.