‘चिन्नास्वामी’वरच आयपीएलचे सामने होण्यासाठी प्रयत्न करणार
बेंगळूर : चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारे आयपीएलचे नियोजित सामने इतरत्र हलवू देणार नाही. हे सामने इथेच व्हावेत यासाठी प्रयत्न करेन, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. केएससीए निवडणुकीत मतदान केल्यानंतर रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना शिवकुमारांनी उत्तर दिले. आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर आयपीएलसह महत्त्वाचे सामने चिन्नास्वामी स्टेडियमवरून हलवण्याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, ही कर्नाटक आणि बेंगळूरच्या सन्मानाची बाब आहे. त्यामुळे पुढील आयपीएल सामने येथेच होतील याची खात्री करण्यासाठी आम्ही पावले उचलू, असे त्यांनी सांगितले. महिला टी-20 विश्वचषक सामन्यांबद्दल विचारले असता, येत्या काही दिवसांत जे काही सामने उपलब्ध असतील त्यांना आम्ही परवानगी देऊ. केएससीए निवडणुकीत मतदान करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी केएससीए सदस्य आहे. मी लहान असताना नागराज यांनी मला सदस्यत्व दिले होते. त्यांचा मुलगा माझा वर्गमित्र आहे. मी ब्रिजेश पटेल यांच्या माध्यमातून अनिल कुंबळे आणि प्रसन्ना यांच्यासह अनेक लोकांना चांगले ओळखतो. मला ज्यांना हवे होते त्यांना मी मतदान केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.