करमळीत अधिकाधिक रेल्वे थांबण्यासाठी प्रयत्न करणार
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन : नेवरा स्थानकावरून स्थानिक आमदार आक्रमक
पणजी : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना सोयीचे व्हावे तसेच त्यातून टॅक्सी व्यावसायिकांचाही फायदा व्हावा या उद्देशाने करमळी स्थानकावर अधिकाधिक रेल्वे थांबाव्यात यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. राज्य विधानसभेच्या काल सोमवारपासून प्रारंभ झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या प्रश्नोत्तर तासात आमदार विरेश बोरकर यांनी आपल्या मतदारसंघात नेवरा येथील नियोजित रेल्वे स्थानकाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याच विषयावरून प्रारंभी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो आणि आमदार बोरकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मंत्री दिशाभूल करणारी माहिती देतात, असा आरोपही बोरकर यांनी केला.
नियोजित स्थानके ही मूळ प्रकल्पाचाच भाग
राज्यात रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पेडणेपासून काणकोणपर्यंत रेल्वे सुरू होणे आवश्यक आहे. त्याचसाठी कोकण रेल्वेने राज्यात मये, नेवरा आणि सारझोरा या तीन भागात रेल्वे क्रॉसिंग स्थानके नियोजित केली आहेत, या स्थानकांमुळे स्थानिक प्रवाशांना जलद रेल्वे वाहतूक सुलभ होईल. तसेच त्याचा फायदा संपूर्ण गोव्याला होईल, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले. तिन्ही स्थानके ही नवीन नसून मूळ रेल्वे प्रकल्पाचाच भाग आहेत. त्यामुळे गोवा सरकार त्यांना विरोध करू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्या उत्तरातून समाधान न झालेल्या विरोधकांनी हा सर्व खटाटोप कोळसा आणि अन्य मालवाहतुकीला चालना देण्यासाठी असल्याचा दावा केला.
मुख्यमंत्र्यांनी त्याचे खंडन केले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी नवीन रेल्वे स्थानकांबाबत पर्यावरणीय मूल्यांकन केले आहे का असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, मंत्री गुदिन्हो यांच्या उत्तरावर समाधान न झालेले आमदार बोरकर यांनी पुढे बोलताना, करमळी स्थानकावर किती गाड्या येतात, तसेच त्या स्थानकाचा फुटफॉल किती आहे? याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली. त्यावर बोलताना, गुदिन्हो यांनी त्या प्रश्नाचे उत्तर कोकण रेल्वेचे अधिकारी देऊ शकतील, असे सांगितले. उद्या एखादी गाडी उशिरा आल्यास, आमदार त्यासंबंधीही आपणासच प्रश्न विचारतील का?’ असा प्रतिप्रश्न बोरकर यांना विचारला.