स्थानिक संस्थांच्या बळकटीसाठी प्रयत्न
आमदार चन्नराज हट्टीहोळी : मास्तमर्डीत ग्रा. पं. इमारतीचे उद्घाटन
बेळगाव : ग्राम पंचायतींना नवीन इमारतीसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन स्थानिक संस्थांच्या बळकटीसाठी काही उपक्रम हाती घेण्यात आले असल्याचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सांगितले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मास्तमर्डी येथे ग्राम पंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 2) करण्यात आले. तत्पूर्वी प्रतिमा पूजन केले. याप्रसंगी ते बोलत होते. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून अनेक ठिकाणी ग्राम पंचायतींसाठी नूतन इमारती उभारण्यात आल्या आहेत. विधानपरिषद सदस्यांच्या स्थानिक विकास निधीतून जिह्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.
स्थानिक संस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मला मत दिलेल्या स्थानिक संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांनी मत दिल्याचे सार्थक झाले, अशारितीने मी कामे करीत आहे. विधानपरिषद सदस्य बनल्यानंतर तळागाळाच्या समस्या जाणून घेऊन कार्य करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या हातून आणखी कामे होण्याची बाकी आहेत. आराखडा तयार करून सरकारकडून विशेष अनुदान मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशिल आहे. तसेच ग्राम पंचायतींना अनुदान वाढवून मिळण्यासाठी सरकारकडे आग्रही मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी, पंचायत विकास अधिकारी, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मास्तमर्डी, बसराकट्टी, शगणमट्टी येथील नागरिक उपस्थित होते.