ट्रम्प-मस्क संघर्ष मिटविण्याचे प्रयत्न
रिपब्लिकन पक्षाने दोन्ही नेत्यांना समंजसपणाचे आवाहन
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष आणि काही दिवसांपर्यंत त्यांचे उजवे हात मानले जाणारे जगातील सर्वात धनाढ्या उद्योगपती इलॉन मस्क यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मात्र, आता त्यांच्यात समझोता घडवून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने पुढाकार घेतला आहे. दोन्ही मान्यवरांनी एकत्र काम केल्यास ते अमेरिकेच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल, असे या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे.
रिपब्लिकन पक्षाने दोन्ही नेत्यांना आवाहन केले असून त्यांनी संघर्ष मिटवावा असा आग्रह त्यांना करण्यात आला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी ट्रम्प आणि मस्क या दोघांनीही एकमेकांच्या विरोधात कोणतेही सकारात्मक किंवा नकारात्मक विधान केले नाही. ट्रम्प हे सध्या व्हाईट हाऊस सोडून न्यू जर्सी येथील आपल्या गोल्फ क्लबच्या परिसरात गेले आहेत. तर मस्क यांनीही ट्रम्प यांच्यासंबंधात शांत राहणे श्रेयस्कर मानले आहे. अमेरिकेच्या अनेक राज्यांमधील रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर्स दोघांमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी वेगाने प्रयत्न करीत आहेत. या दोन नेत्यांच्या संघर्षाचा रिपब्लिकन पक्षाला फटका बसू शकतो, असे या पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांचे आणि या पक्षाच्या काही प्रांतांच्या गव्हर्नर्सचेही म्हणणे आहे. त्यामुळे लवकरच डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील दुरावा मिटून ते एकत्र येऊ शकतात, असा आशावाद रिपब्लिकन पक्षाकडून व्यक्त होत आहे.