For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न

11:51 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्यमंत्री साहाय्यता निधीतील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न
Advertisement

महाराष्ट्राचे विशेष अधिकारी चिवटे यांची बेळगावला भेट

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री साहाय्यता वैद्यकीय निधीतून सीमाभागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत. परंतु, कागदपत्रांची पूर्तता, तसेच हॉस्पिटलला आवश्यक असणारी कागदपत्रे यामुळे अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी सोमवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी व मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी बेळगावला भेट दिली.

डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व अरिहंत हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन अडचणी जाणून घेतल्या. हॉस्पिटलच्या प्रशासनाशी चर्चा करून साहाय्यता निधीच्या अंमलबजावणीविषयी काही सूचना मांडल्या. श्रीकृष्ण पन्हाळकर (लिवर ट्रान्स्प्लांट, 2 लाख रुपये), प्रशांत हंडे (किडनी ट्रान्स्प्लांट, 2 लाख रुपये), अभिजीत सावंत (हार्ट ट्रान्स्प्लांट, 2 लाख रुपये), सिद्धाप्पा रवळूचे (ओपन हार्ट सर्जरी, 1 लाख रुपये) यांच्या अर्जांवर ताबडतोब निर्णय घेऊन त्यांना अर्थसाहाय्य मंजूर केले. तसेच इतर अर्जदारांसंदर्भात आवश्यक माहिती कक्षाला कळविण्याची विनंती केली.

Advertisement

यावेळी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले, सीमाभागातील अधिकाधिक नागरिकांनी महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय सेवांचा लाभ घ्यावा. मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून योजनेची माहिती करून घ्यावी. याबरोबरच महाराष्ट्र सरकारच्या महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ सीमावासियांना देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

दिंड्यांना आर्थिक साहाय्य द्या

डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे पीआरओ शंकर परसन्नावर यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. याबरोबरच सीमाभागातील दिंड्यांना आर्थिक साहाय्य द्यावे, या मागणीचे निवेदनही चिवटे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, आरोग्य समन्वयक आनंद आपटेकर, अनिल आमरोळे, मजुकर यांच्यासह अर्जदारांचे नातेवाईक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.