पीडीपीएस अंतर्गत कांदा खरेदीसाठी प्रयत्न
मंत्री शिवानंद पाटील : केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार
बेंगळूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने पीडीपीएस अंतर्गत कांदा खरेदीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी बाजारपेठ मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. चालू खरीप हंगामात मुसळधार पावसामुळे तोडणीला आलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील वर्षी बाजारपेठेतील कांदा दराशी तुलना केली तर यंदा विक्री दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याचा अहवाल अधिकाऱ्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पीडीपीएस अंतर्गत कांदा खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जात आहे, अशी माहिती मंत्री शिवानंद पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यात खरीप आणि रब्बी हंगामात एकूण 5.05 लाख हेक्टर प्रदेशात कांदा पीक घेतले जात आहे. वार्षिक उत्पन्न 27 लाख मेट्रिक टन आहे. प्रामुख्याने विजापूर, चित्रदुर्ग, बागलकोट, विजयनगर, बेळगाव, धारवाड, कोप्पळ आणि गदग जिल्ह्यांमध्ये कांदा पीक मोठ्या प्रमाणावर पिकविले जाते. मात्र अतिपावसामुळे तोडणीला आलेल्या कांदा पिकाची हानी झाली आहे. दुसरीकडे दरही गडगडल्याने कांदा पीक शेतातच खराब होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. एसआयएस (बाजारपेठ हस्तक्षेप योजना) अंतर्गत कांदा खरेदीची शिफारस केली होती. परंतु, पीडीपीएस अंतर्गत कांदा खरेदी करणे योग्य असल्याचे मत व्यक्त झाल्याने परवानगी मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.