व्हॅक्सिन डेपो प्लास्टिकमुक्तसाठी प्रयत्न
बेळगाव : समर्थ भारत प्रतिष्ठानच्यावतीने सुभाषचंद्रनगरचे रहिवासी आणि उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि सूरज नेतलकर यांनी मंगळवारी सकाळी व्हॅक्सिन डेपो परिसर प्लास्टिकमुक्त मोहीम राबविली. या ठिकाणी पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या व इतर विखुरलेले साहित्य पाहून त्यांनी ते जमा करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून फिरावयास गेलेले अनेकजण त्यांच्या मदतीला आले आणि बघता बघता बराचसा प्लास्टिकचा कचरा जमा झाला. महानगरपालिकेच्या गाडीला बोलावून तो कचरा कचराडेपोला पाठविण्यात आला. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळण्याबरोबरच प्लास्टिकचा कचरा टाकून परिसर खराब करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज व्हॅक्सिन डेपोचा एक भाग स्वच्छ झाला. ही मोहीम इतर भागातही अशाच पद्धतीने नेहमीच राबविली जाणार असल्याचे आप्पासाहेब गुरव यांनी यावेळी सांगितले.