ट्रम्प यांना तिसरी टर्म देण्यासाठी प्रयत्न
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाचा तिसरा कालावधीही मिळावा यासाठी त्यांच्या रिपब्लिकन पक्षाने प्रयत्न करण्यास प्रारंभ केला आहे. या पक्षाचे टेनेसी प्रांताचे सिनेटर एंडी ओगल्स यांनी यासंदर्भात एक संयुक्त प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत सादर केला आहे. अमेरिकेच्या नियमानुसार कोणतीही व्यक्ती केवळ दोन पूर्ण कालावधीकरताच अमेरिकेच्या अध्यक्षपदी येऊ शकते. तिसऱ्या वेळी अशा व्यक्तीला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून भाग घ्यायचा असेल, तर त्यासाठी अमेरिकेच्या घटनेत परिवर्तन करावे लागते.
ओगल्स यांनी यासाठी अमेरिकेच्या घटनेतील 22 व्या परिवर्तनात आणखी परिवर्तन करण्यासाठी हा प्रस्ताव सादर केला आहे. ट्रम्प हे अमेरिकेची घसरण रोखण्यासाठी आणि अमेरिकेला पुन्हा महान राष्ट्र बनविण्यासाठी सक्षमपणे मार्गक्रमण करीत आहेत. ही क्षमता असणारे ते अमेरिकेच्या आधुनिक इतिहासातील एकमात्र नेते आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या सामर्थ्यवर्धनाची ही प्रक्रिया खंडित होऊ नये म्हणून त्यांना अध्यक्षपदी तिसरा कार्यकाळ मिळणे आवश्यक आहे. म्हणून हा घटनापरिवर्तन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, असे प्रतिपादन एंडी ओगल्स यांनी शुक्रवारी केले. सध्या अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे घटना परिवर्तन करणे सुलभ होण्याची शक्यता आहे.
घटनेतील 22 वे परिवर्तन
अमेरिकेच्या घटनेत 22 वे परिवर्तन करण्यात आल्यानंतर अध्यक्षांचा कालावधी 2 कार्यकाळांपुरताच मर्यादित करण्यात आला. या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला दोन कार्यकाळांपेक्षा अधिक काळ (एकंदर आठ वर्षे) अमेरिकेच्या अध्यक्षपदी राहता येत नाही. तसेच ज्या व्यक्तीने राष्ट्राध्यक्ष पदावर कार्य केले आहे, किंवा अन्य राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळातील दोन वर्षांहून अधिकचा काळ राष्ट्राध्यक्ष पदावर काम केले आहे, अशा व्यक्तीला त्यानंतर केवळ एकदाच राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकता येते. त्यानंतर अशी व्यक्ती पुन्हा तिच्या आयुष्यात कधीही राष्ट्राध्यक्षपदी येऊ शकत नाही किंवा या पदासाठीच्या निवडणुकीतही उमेदवार असू शकत नाही. ट्रम्प यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. त्यामुळे घटनेच्या 22 व्या परिवर्तनात आणखी परिवर्तन केल्यानंतरच ते तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. त्यामुळे या दिशेने प्रयत्न केला जात आहे.