शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न : कृषिमंत्री
शेतकऱ्यांचे उत्पन्न वेगाने वाढतेय : कमी व्याजदरात मिळणार कर्ज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असून या कामात कुठलीही कसर ठेवली जात नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी संसदेत सांगितले आहे. शेतकऱ्यांना खतांवर मिळणाऱ्या अनुदानात कुठलीच घट केली जाणार नाही तसेच त्यांना कमी व्याजदरावर कर्ज मिळणार असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभेत समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदौरिया यांनी विचारलेल्या पूरक प्रश्नाला चौहान यांनी उत्तर दिले आहे. एनएसएस अहवालानुसार 2002-03 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रतिमहिना 2,015 रुपये होते. 2018-19 मध्ये हा आकडा वाढून 10,218 रुपये झाला आहे. 2019 नंतर हे सर्वेक्षण झालेले नाही. आता पुढील वर्षी हे सर्वेक्षण पार पडणार असल्याचे चौहान यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. 2019 नंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न वेगाने वाढले असल्याचा आम्हाला विश्वास असल्याचे उद्गार कृषिमंत्र्यांनी काढले आहेत.
अनुदानात होणार नाही घट
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, उत्पादनाचा खर्च कमी करणे, उत्पादनाला योग्य दर देणे, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानाची भरपाई करणे, कृषी वैविध्यकरण आणि जैविक तसेच नैसर्गिक शेतीला चालना देण्याच्या सहा सूत्री कार्यक्रमासोबत सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांना खतांवर मिळणाऱ्या अनुदानात कुठलीच घट होऊ देणार नाही. तसेच त्यांना कमी व्याजावर कर्ज मिळत राहणार आहे. सरकारने एमएसपीवर उच्चांकी खरेदी केली आहे. मागील संपुआ सरकारच्या काळात केवळ 6 लाख मेट्रिक टन डाळींची खरेदी झाली होती. परंतु आमच्या सरकारने एक कोटी मेट्रिक टनाहून अधिक डाळींची खरेदी केली असल्याचे शिवराज यांनी संसदेला सांगितले आहे.