दर्शनसुलभ शवप्रदर्शन करण्याचे प्रयत्न : मुख्यमंत्री
शवप्रदर्शन तयारीचा घेतला आढावा : सुमारे 90 टक्के काम पूर्ण
पणजी : जुने गोवे येथील फेस्त आणि यंदा होणाऱ्या फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शनाची तयारी जवळजवळ पूर्णत्वाकडे पोहोचली असून 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. जुने गोवेत स्थापन करण्यात आलेली फ्रान्सिस झेवियर सेक्रेटेरिएट पूर्ण झाली असून तेथेच काल रविवारी फेस्त आणि प्रदर्शन तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मंत्री आलेक्स सिक्वेरा आणि नोडल अधिकारी संदीप जॅकीस यांच्यासह अन्य अधिकारी बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, बैठकीत तयारीचा सर्वंकष आढावा घेतला. आतापर्यंत सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यात चिंबल येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचाही समावेश आहे. उर्वरित 10 टक्के कामे येत्या दि. 15 पर्यंत पूर्ण होतील. त्यासाठी साबांखा, पोलिस, अग्निशामक, वैद्यकीय आणिबाणी, रस्ते दुऊस्ती तथा बांधकामे यांचा त्यात समावेश आहे.
भाविकांना सुलभता देण्याचा प्रयत्न
या पूर्ण झालेल्या कामांचा अंतिम आढावा घेण्यात येईल. त्यासाठी दि. 17 किंवा 18 रोजी आयोजन समितीची पुन्हा बैठक होईल. फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन दर दहा वर्षांनी होत असते. मात्र यंदाचे प्रदर्शन व त्याची तयारी फारच प्रगत व अनेक सोयीसुविधांनी युक्त असेल. प्रदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन घेणे सोपे व्हावे यादृष्टीनेही अनेक सुलभता आणण्यात येणार आहेत. त्याशिवाय भाविकांना प्रदर्शनस्थळी पोहोचण्यासाठी राज्याच्या विविध भागातून व खास करून पणजी आणि मडगाव बसस्थानकांवरून कदंबच्या विशेष बसेस नियुक्त करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जुने गोवे सभोवताली परिसरातील भागातील आणि खास करून रायबंदर, चिंबल येथील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी विचारले असता, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे काही कामे पूर्ण होण्यास विलंब होत आहे. तरीही येत्या दि. 15 रोजी सर्व कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न असतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.