हलगा-मच्छे बायपासचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी धडपड
शेतकऱ्यांचा बायपासला विरोध झाला कमी : ठेकेदाराकडून युद्धपातळीवर काम सुरू
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी उरकण्यासाठी ठेकेदाराकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यावर मातीचा भराव टाकण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून त्यावर रोलर फिरविला जात आहे. शेतकऱ्यांचा विरोधदेखील थंडावल्याने रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील वाढती वाहतूक समस्या कमी व्हावी, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाकडून हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या कामाला सुरुवातीला शेतकऱ्यांतून तीव्र विरोध झाला. रस्त्यासाठी पिकाऊ जमीन देणार नाही, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने केली. इतकेच नव्हे तर न्यायालयीन लढाईदेखील देण्यात आली. मात्र, सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना अपयश आले. लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाकडे अपेक्षेने पाहणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली. सध्या हा दावा न्यायप्रविष्ट आहे. झिरो पॉईंट निश्चित होत नाही, तोपर्यंत रस्त्याचा वापर करण्यात येऊ नये, असा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदाराकडून रस्त्याचे काम सुरू ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा विरोधदेखील कमी झाल्याने ठेकेदाराकडून पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
पावसाळ्यात रस्त्याचे काम दरवर्षी होतेय ठप्प ...
गेल्या पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत होते. शेतकऱ्यांचा विरोध, त्याचबरोबर न्यायालयाचा स्थगिती आदेश आदी कारणांमुळे अनेकवेळा रस्त्याचे काम ठप्प झाले. त्यातच पावसात यंत्रसामग्री रस्त्याच्या ठिकाणी नेणे कठीण जात असल्याने पावसाळ्यात रस्त्याचे काम दरवर्षी ठप्प होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून पिकांची पेरणी केली जात आहे. पण यावेळी पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी ठेकेदाराकडून युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले आहे.