For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी प्रयत्न हवा

06:13 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी प्रयत्न हवा
Advertisement

गोव्यात सध्या समाजमन मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रिय होताना दिसत असून पर्यावरण, निसर्ग संवर्धनाबाबत लोक खूप सजग, दक्ष आहेत. थर्मोकोल, प्लास्टिक, दारुकामाच्या आतषबाजीला फाटा देऊन अनेक ‘इको प्रेंडली’ गोष्टींचा स्वीकार केला जात आहे, मग पर्यावरणपुरक अशा गणेशोत्सवात या ‘पीओपी’ मूर्तीचा वापर कमीत कमी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

Advertisement

गणेशोत्सव हे गोव्यातील सर्वांत मोठ्या उत्साहाचे, आनंदाचे, भक्तीचे तसेच कलेच्या आविष्काराचे महापर्व आहे. प्राचीन काळापासून गणेशोत्सवाने संपूर्णत: पर्यावरणपुरकतेचे तत्व जोपासले आहे. मध्यंतरीच्या काळात पर्यावरणाला घातक ठरणारे प्रकार होऊ लागले होते. मात्र कालांतराने समाजमनात बदल दिसून आला. अलीकडच्या काळात गणेशोत्सव पुन्हा पर्यावरणपुरक होत आहे. गणेशोत्सवातील सजावटीसाठी प्लास्टिक, थर्माकोल व अन्य घातक वस्तुंचा वापर आता नगण्य होत आहे, ही खूप समाधानाची बाब. माटोळी व अन्य सजावटही पर्यावरणपुरक होत असताना या उत्सवातील केंद्रबिंदू, उर्जाबिंदू असलेली गणेशमूर्तीच का म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसची (पीओपी) असावी? सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाच्या या इको प्रेंडली गणेशोत्सवात पीओपीचे हे विघ्न हवेच कशाला?

मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचेच पूजन व्हायला हवे. श्रीगणेश पुराणात भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला करायच्या श्रीणेशचतुर्थी व्रताचे महात्म्य सांगितले आहे. गणेशमूर्ती मातीचीच असायला हवी कारण त्या दिवशी गणराय पृथ्वीवर अवतरतात. पृथ्वी म्हणजे भूमी. भूमी म्हणजे माती. या दिवशी पृथ्वी गणेशतत्वाने परिपूर्ण असते. गणेशतत्वाच्या लहरी मातीच्या मूर्तीमध्ये प्रकट होऊन त्या तत्वाचा लाभ श्रीगणेशपूजा करणाऱ्यांना होतो. गणेशपूजनाचा हेतु हाच. हाच संकल्प करुन गणेशपूजा केली तरच तिचे फळ मिळेल, हे गणेशभक्तांनी जाणून घ्यायला हवे.

Advertisement

गणरायाने आपल्यावर कृपा करावी म्हणून आपण सारे गणेशोत्सवात त्याचे भक्तिभावाने, उत्साहाने पूजन करतो. दीड दिवसांपासून पाच, सात, नऊ, अकरा, एकवीस दिवस अशी त्याची सेवा करताना आपले दु:ख, समस्याच नव्हे, तर अगदी तहान, भूकही विसरुन जातो. महागाई कितीही असली तरी बाप्पाच्या सेवेत तसूभरही कमतरता ठेवत नाही. मूळ घरापासून दूर गेलेली मंडळी मोठ्या मनाने घरी येतात. गुण्यागोविंदाने नांदून गणेशोत्सवाच्या पर्वात मनसोक्त रममाण होऊन जातात. मात्र या पर्वणीत उत्सवाचे केंद्रस्थान असलेली गणेशमूर्ती पीओपीची असणे म्हणजे उत्सवातील ते विघ्न आहे, हे सर्वजण ध्यानातच ठेवत नाही. पीओपीची मूर्ती शास्त्रसंगत नाही. गणेशमूर्ती चिकणमातीची, शाडुमातीचीच असायला हवी, हे प्रत्येक हिंदुने लक्षात घ्यावे आणि आचरणात आणावे, हेच गणेशकृपेचे माध्यम आहे, हेच कल्याणकारी आहे.

पीओपीच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे नदी, विहिरी, तळ्या, समुद्र यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पीओपी हा पदार्थ संपूर्णत: घातक रासायनिक असल्याने तो पर्यावरणपुरक अजिबात नाही. कितीही वेळ, कितीही प्रयत्न केले तरी या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. पीओपीच्या मूर्ती वजनाने हलक्या असतात, दिसायला सुंदर असतात ही कारणे दुय्यम ठरवा आणि केवळ श्रीगणेशतत्वाचा अंगिकार करा, हेच कल्याणकारी आहे.

पीओपीच्या मूर्तीवर गोवा सरकार बंदी घालते. तरीही दरवर्षी गोव्याबाहेरुन पीओपीच्या लाखो गणेशमूर्ती गोव्यात आणल्या जातात आणि त्या विकल्या जातात. या दुष्कर्मात सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असतो, अन्यथा या मूर्ती घेऊन येणारी वाहने चेकनाक्यावरुन कशी गोव्याच्या हद्दीत पोहोचतात? या मूर्ती गोव्यात पोहोचल्यानंतर त्यांची विक्री करणारे हे धंदेवाईकच असतात. खरे गणेशमूर्तीकार गणेशभक्तही असतात आणि शास्त्रीय गणेशमूर्तीकारही असतात. आपण गणेशमूर्ती पूजणार ती मातीचीच हे पूजणाऱ्यांनी ठरवायला हवे आणि दुसऱ्या बाजूने सरकारने जे पारंपरिक गणेशमूर्तीकार आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभराची व्यवस्था करायला हवी. आवश्यक असलेली माती न मिळणे, नैसर्गिक रंगांच्या किमती, माती मळण्याची यंत्रे व अन्य सामग्रीबाबतच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यात मदत करायला हवी. अजूनही अनेक पिढ्या अगदी मन लावून, आत्मीयतेने मातीपासून चिकणमातीची गणेशमूर्ती साकारत आहेत. गावागावांमध्ये पीओपीच्या गणेशमूर्तीची दुकाने थाटण्यात येत असली तरीही त्याच गावांमध्ये पारंपरिक गणेशचित्रशाळा अजूनही तग धरुन राहिलेल्या आहेत. तरुण तसेच तरुणींही घरातील पिढ्यानपिढ्यांच्या चित्रशाळेत रात्री जागवून सुबक गणेशमूर्ती साकारतात हे पाहून खूप आनंद होतो. मूर्तीकलेची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही काही तरुण फाईन आर्ट शिकतात आणि मूर्तीकला आत्मसात करुन घेत आहेत. हे सारे सकारात्मक चित्र म्हणजे ‘बुलंद भारत की बुलंद तसबीर’ आहे. संपूर्ण देशभरात गोव्यातच गणेशतुर्थी मोठ्या प्रमाणात होते, अगदी घरोघरी हा सण दिमाखात साजरा केला जातो. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या लाखो गणेशमूर्ती उपलब्ध होणेही तेवढेच महत्वाचे आहे. म्हणून अशी व्यवस्था तयार व्हायला हवी जी किमान सहा महिने कार्यरत असेल आणि त्याद्वारे सर्वांना गणेशचतुर्थीला मातीच्या गणेशमूर्ती उपलब्ध होतील. सध्या गोवा विधानसभेत मयेचे भाजप आमदार प्रेमेंद्र शेट हे स्वत: गणेशमूर्तीकार आहेत. त्यांचे बंधू माजी आमदार, माजी सभापती स्व. अनंत शेटही गणेशमूर्तीकार होते. गोवा हस्तकला महामंडळातर्फे दर गणेशचतुर्थीला मूर्तीकारांना प्रती मूर्तीमागे दोनशे रुपये मदत देण्याच्या योजनेचा विस्तार व्हायला हवा. मूर्तीकारांच्या उपरोल्लेखित समस्या सोडविल्या पाहिजेत. प्रेमेंद्र शेट यांनी याप्रकरणी पुढाकार घेतल्यास संपूर्ण गोवाभरातील गणेशमूर्तीकारांचे संघटन बांधता येईल. नव्या तरुणांच्या हाताला दैवी कार्य देता येईल. सर्व गोष्टी सुरळीत करता येतील आणि खऱ्या अर्थाने सात्विक, शास्त्रीय गणेशपूजन करुन श्रीगणरायाच्या कृपेस पात्र होता येईल. सध्या समाजमन मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रिय होताना दिसत असून पर्यावरण, निसर्ग संवर्धनाबाबत लोक खूप जागृत होत आहेत. थर्मोकोल, प्लास्टिक, दारुकामाच्या आतषबाजीला फाटा देऊन अनेक इको प्रेंडली गोष्टींचा स्वीकार केला जात आहे, तसा प्रयत्न यापुढेही इतरांनी आत्मसात करायला हवा.

राजू भिकारो नाईक

Advertisement
Tags :

.