'नीलम'च्या उपचारासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
उंब्रज / प्रवीण कांबळे :
अमेरिकेत भीषण अपघात होऊन कोमात गेलेल्या लेकीला वाचवण्यासाठी वडिलांचे काळीज तुटत आहे. पायाला भिंगरी लावून ते वैद्यकीय तज्ज्ञांच्या हातापाया पडत आहेत. वडिलांची ही आर्त हाक ऐकून ज्या रुणालयात नीलमवर उपचार सुरू आहेत, तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आता नीलमच्या पोटात अन्न जाऊ लागले असून एमआरआयमध्येही थोडीसी प्रगती दिसून येत असल्याचे तेथील डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. उपचारासाठी आणखी दोन ते तीन महिनाचा कालावधी लागणार असल्याचेही डेव्हिस मेडिकल सेंटर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
सोमवारी ३ मार्चला नीलमचे वडील तानाजी शिंदे हे अमेरिकेतील सॅक्रामेंटोमध्ये दाखल होताच त्यांनी मध्यरात्री थेट हॉस्पिटल गाठले. नीलमची अवस्था पाहून अक्षरशः त्यांना रडू कोसळले. बापमाणूस रडत होता, तेव्हा रुग्णालयातील स्टाफचेही डोळे पाणावले होते. कोमात असलेल्या लेकिला वडिलांनी हाक मारली, तेव्हा नीलमने पापण्यांची हालचाल केली. तिचा श्वासोच्छ्वास वाढला. तेथील डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले नीलमवर की, आणखी दोन तीन महिने उपचार करावे लागतील. तोपर्यंत हॉस्पिटलच सर्व प्रकारची काळजी घेणार असून नातेवाईकांना फक्त बघण्याची मुभा आहे. नुकत्याच झालेल्या एमआरआयमध्ये नीलमच्या मेंदूमधील काही सेलमध्ये थोडीसी प्रगती आढळून आली आहे. परंतु यात सुधारणा होण्यासाठी वेळ लागणार आहे.
दरम्यान नीलमच्या पोटात अन्न जाण्यासाठी अन्न नलिकेव्दारे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ती केव्हा शुध्दीवर येईल, हे सांगता येत नाही. शुध्दीवर येईपर्यंतची काळजी रुग्णालय घेणार आहे. उपचारानंतर नीलम व्हिलचेअरवर येईल, तेव्हाच तिला मदतीसाठी नातेवाईकांची गरज लागणार आहे. तसेच रुग्णालय व्यवस्थापनाने नीलमचे उपचार योजनेमध्ये बसवले असून वडिलांच्या राहण्याचीही सोय केली आहे.
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) गावच्या नीलम तानाजी शिंदे या तरुणीचा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो शहरात १८ दिवसांपूर्वी कार अपघात झाल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. तिच्यावर युसी डेव्हिस मेडिकल सेंटरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याने ती कोमात आहे.
दहा बारा दिवसाच्या प्रयत्नानंतर इमर्जन्सी व्हिसा मिळताच तानाजी शिंदे यांनी लेकीला भेटण्यासाठी अमेरिकेत पोहोचले आहेत. २२ दिवसापासून नीलम कोमात आहे. तिचे दोन्ही पाय व एका हाताची हालचाल होत नाही. प्रकृती ढासळली असून वजन मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. २२ दिवसांपासून तिच्या पोटात अन्न गेलेले नव्हते. तिचे वडील तिथे पोहोचवल्यानंतर उपचाराच्या अनुषंगाने हॉस्पिटल व्यवस्थापनाशी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सध्या नीलमच्या पोटात अन्न जाण्यासाठी अन्ननलिकेतून फिडींग देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
- वडिलांचा अमेरिकेत महिनाभर मुक्काम
नीलमच्या वडिलांची तब्येतीची तक्रार आहे. त्यातच अमेरिकेत सध्या थंडीची लाट आहे. त्यामुळे तेथील वातावरणाचा त्यांना त्रास होऊ लागला आहे. तसेच त्यांच्या सोबत गेलेला गौरव कदम यालाही त्रास झाला. काही दिवसात तो भारतात परतणार आहे. नीलमचे वडील तानाजी शिंदे हे महिनाभर तिथे राहून भारतात परतणार आहेत. त्यानंतर गरज लागल्यानंतर पुन्हा त्यांना अमेरिकेत बोलवले जाणार आहे.
- संजय कदम, वडगाव (उंब्रज) नीलमचे मामा