For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारी शाळा टिकविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे

11:06 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
सरकारी शाळा टिकविण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे
Advertisement

22 सप्टेंबर रोजी सरकारी शाळा वाचविण्यासाठी भव्य अभियान राबविणार

Advertisement

आण्णाप्पा पाटील/बहाद्दरवाडी

राष्ट्रपिता महात्मा गांधींजींनी ‘खेड्याकडे चला’, असा संदेश दिला होता. कारण खरा भारत हा खेड्यातच राहतो. देशाचा विकास व्हायचा असेल तर खेडेगावांचा विकास झाला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. त्या दृष्टीकोनातून सरकारमार्फत विविध योजना राबवून ग्रामीण भागाचा विकास करण्यात येत आहे. सध्या पालक वर्गांमध्ये इंग्रजी व खासगी शाळांचे फॅड अधिक प्रमाणात निर्माण झाले आहे. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणे हा महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. मातृभाषेतील व सरकारी शाळा टिकविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षण हा त्याच्या शिक्षणाचा मुख्य पाया आहे. या प्राथमिक शिक्षणावरच त्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे प्राथमिक शाळेतील शिक्षण उत्तम दर्जाचे होणे गरजेचे आहे. तसेच त्या शाळेत सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मिळणे महत्त्वाचे आहे. यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. आता खरी गरज आहे ती सरकारी शाळांबद्दल जनजागृती निर्माण करण्याची.

Advertisement

शाळा टिकविण्यासाठी आवाज उठविणे गरजेचे

सर्वसामान्य लोकांना इंग्रजी शाळा अथवा खासगी शाळांमध्ये भरमसाठ प्रवेश शुल्क देऊन शिक्षण घेणे परवडणारे नाही. ज्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यांना अशा शाळा परवडतील. मात्र सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील लोकांना सरकारी शाळा ह्याच महत्त्वाच्या आहेत. या शाळा टिकविण्यासाठी ग्रामीण भागातून शिक्षणप्रेमी नागरिकांतून आवाज उठविणे गरजेचे आहे.   या सरकारी शाळांमध्ये एसडीएमसी कमिटीची नेमणूक करण्यात आली आहे. या एसडीएमसी कमिटीच्या सर्व सदस्यांनी शाळेमध्ये अंतर्गत राजकारण न करता केवळ प्रामाणिकपणे शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

20 रोजी शिक्षणप्रेमींची बैठक

बेळगाव तालुक्यात काही एसडीएमसी कमिटीचे सदस्य गेल्या वर्षापासून सरकारी शाळा वाचविण्यासंदर्भात विविध बैठका घेऊन जनजागृती करत आहेत. याच शाळांसाठी शुक्रवार दि. 20 रोजी दुपारी 2.00 वा. मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रिज, गोवावेस बेळगाव येथे सर्व एसडीएमसी कमिटीच्या व शिक्षण प्रेमी नागरिकांची बैठक आयोजिली आहे. त्याचबरोबर खानापूर येथे रविवार दि. 22 रोजी सरकारी शाळा वाचविणे यासाठी भव्य अभियान आयोजित केले आहे.

बेळगाव तालुका             शिक्षक

  • कायम स्वरुपी शिक्षक      1381
  • अतिथी शिक्षक                234

बेळगाव तालुका                         सरकारी शाळांची संख्या

  • पूर्व प्राथमिक मराठी शाळा (पहिली ते पाचवी)          15
  • पूर्व प्राथमिक कन्नड शाळा (पहिली ते पाचवी)           65
  • पूर्व प्राथमिक उर्दू शाळा (पहिली ते पाचवी)              11
  • उच्च प्राथमिक मराठी शाळा (पहिली ते सातवी)         89
  • उच्च प्राथमिक कन्नड शाळा (पहिली ते सातवी)          90
  • उच्च प्राथमिक उर्दू शाळा (पहिली ते सातवी)             11

बेळगाव तालुका                       विद्यार्थी पटसंख्या

  • मराठी शाळा (पहिली ते सातवी)   14084
  • कन्नड शाळा (पहिली ते सातवी)    22996
  • उर्दु शाळा (पहिली ते सातवी)        985
  • एकूण                                     38065
Advertisement
Tags :

.