‘ब्रिक्स’मध्ये बांगलादेशच्या समावेशासाठी प्रयत्न
चीनच्या प्रयत्नांमुळे भारताच्या अडचणी वाढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीन पुन्हा एकदा ब्रिक्सच्या विस्तारासाठी आग्रही असून यावेळी बांगलादेशला यात सामील करू पाहत आहे. चीनने ब्रिक्समध्ये देशांच्या गटात बांगलादेशला सामील करण्यासाठी समर्थन जाहीर केले आहे. बांगलादेशकडून ब्रिक्समध्ये सामील होण्याच्या व्यक्त करण्यात आलेल्या इच्छेला चीनचे उपविदेशमंत्री सुन वेइडोंग यांनी समर्थन दर्शविले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पुढील महिन्यात चीनचा दौरा करणार आहेत.
दुसरीकडे ब्रिक्स देशांच्या विदेश मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक रशियात होणार आहे. यात ब्रिक्सचा आणखी एक विस्तार करत पाश्चिमात्य शक्तींच्या विरोधात मोठे व्यासपीठ तयार करण्याची चीन आणि रशियाची इच्छा आहे. तर ब्रिक्सच्या आणखी एका विस्तारामुळे समुहात चीनचा प्रभाव वाढण्याची चिंता भारताला सतावत आहे. अशा स्थितीत पुढील 5 वर्षापर्यंत ब्रिक्सचा विस्तार होऊ नये अशी भूमिका भारताची राहू शकते. अलिकडेच ब्रिक्सचा विस्तार करत यात सौदी अरेबिया आणि युएई यासारख्या देशांना सामील करण्यात आले आहे.
बांगलादेश-चीन संबंध मजबूत
ब्रिक्सचा विस्तार आणि सदस्यत्वावरून अलिकडेच चीनचे उपविदेशमंत्री आणि बांगलादेशचे विदेश सचिव मसूद बिन मोमेन यांच्यात बैठक झाली होती. यादरम्यान चीन आणि बांगलादेशच्या द्विपक्षीय संबंधांना मजबूत करणे आणि व्यापार वाढविण्यावर चर्चा झाली होती. ब्रिक्सच्या सदस्यत्वासाठी बांगलादेशचे जाहीर समर्थन करण्याचे आश्वासने चीनने बांगलादेशला दिले आहे.
बांगलादेश इच्छुक
चीनसोबतच्या संबंधांना आम्ही अत्यंत अधिक महत्त्व देतो. बांगलादेशचे चीनसोबतचे संबंध संयुक्त मूल्ये, परस्पर सन्मान आणि संयुक्त आकांक्षांवर आधारित आहेत असे बांगलादेशकडून म्हटले गेले आहे. तर बांगलादेशच्या विदेश सचिवांनी पायाभूत सुविधांच्या विकासात मदत करण्यासाठी चीनचे आभार मानले आहेत. ब्रिक्सचे सदस्यत्व प्राप्त करत विकसनशील देशांसोबतचे संबंध मजबूत करण्याची बांगलादेशची इच्छा आहे. ब्रिक्समध्ये चीन आणि भारत दोन्ही देश आहेत. हे दोन्ही देश बांगलादेशचे मोठे व्यापारी भागीदार आहेत. बांगलादेशला ब्रिक्सचे सदस्यत्व मिळाल्यास सदस्य देशांसोबतच्या आर्थिक समन्वयाला चालना देता येणार आहे.