For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी करा

12:47 PM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी करा
Advertisement

खासदार जगदीश शेट्टर यांची सूचना : सुवर्णसौधमध्ये दिशा समितीची बैठक

Advertisement

बेळगाव : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेची जिल्ह्यात प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करावी. प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवावे. तसेच केंद्र पुरस्कृत विविध विकासकामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करण्यावर भर द्यावा. जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विशेष भर देत उडुपी व मंगळूरच्या धर्तीवर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्याची गरज आहे. जिल्हा सर्वार्थाने साधनसंपन्न असून शिक्षण, पायाभूत सुविधा व ग्रामीण विकास क्षेत्रात अधिक प्रगती साधावी, अशा सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी केल्या.

मंगळवारी सुवर्णविधानसौध येथील व्हिडिओ कॉन्फरन्स सभागृहात आयोजित 2026-27 या वर्षाच्या त्रैमासिक जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती (दिशा) बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शेट्टर म्हणाले, काही गावांमध्ये जलजीवन मिशनची अंमलबजावणी योग्यरित्या झालेली नाही. कमी पावसामुळे उद्भवणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात. पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या भागांची ओळख करून तेथे प्रभावी पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, असे त्यांनी सांगितले. शहरात एलअॅण्डटीच्या कामांमुळे निर्माण झालेल्या पाणीपुरवठा समस्येची दखल घेत महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.

Advertisement

शहर विकास योजनांतील कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी विभागीय समन्वय वाढवावा. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन समस्या सोडवाव्यात. खोदकामानंतर रस्ते दुऊस्त करण्यात येत नसल्याने नागरिकांना त्रास होत असून संबंधित विभागाने समन्वयातून रस्त्यांची कामे पूर्ण करून घ्यावीत, असेही शेट्टर म्हणाले. जिल्ह्यात खरीप हंगामाची पेरणी सुरू असून शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा. भविष्यात खतांचा तुटवडा निर्माण झाल्यास केंद्र सरकारशी समन्वय साधून आवश्यक पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल.

राज्य व केंद्र सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँकांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी. कर्ज व अनुदान वेळेत उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांकडून वीज ट्रान्सफॉर्मर दुऊस्तीबाबत तक्रारी येत असल्याने तातडीने दुऊस्तीची व्यवस्था करण्यात यावी. तसेच ई-मालमत्ता (ई-खाते) प्रमाणपत्रांचे वितरण जलदगतीने करावे, असेही शेट्टर यांनी सांगितले. जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा उपाययोजनांची माहिती दिली. चिकोडी तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी 22 कूपनलिका निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच सर्व ग्राम पंचायतींकडे पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र टँकर उपलब्ध आहे.

बहुग्राम पेयजल योजनेद्वारेही पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असून कायमस्वरुपी उपाययोजनेसाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी खासदार इरण्णा कडाडी, खासदार प्रियांका जारकीहोळी, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त एम. कार्तिक, पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर, समाज कल्याण खात्याचे सहसंचालक रामनगौडा कन्नोळ्ळी, जिल्हा आरोग्याधिकारी ईश्वर गडाद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आवश्यक उपाययोजना...

बैठकीत जिल्ह्यातील संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबरोबरच आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवणे व मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यावरही भर देण्यात आला.

Advertisement
Tags :

.