प्रभावी शिक्षणामुळेच समाज समृद्ध बनेल
आमदार राजू सेठ : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
बेळगाव : देश आणि राज्य शिक्षणामुळेच समृद्ध होऊ लागले आहे. इंजिनिअर, डॉक्टर, संशोधक हे शिक्षणामुळेच पुढे आले आहेत. अलीकडे शिक्षणाच्या धोरणात आमूलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळेच लहान वयात विद्यार्थी आयपीएस, आयएएस होत आहेत. हा शिक्षणाचा प्रभाव आहे. आई-वडिलांप्रमाणेच शिक्षकांचे कार्यही मोठे आहे, असे गौरवोद्गार उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी काढले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, शिक्षण खाते, गटशिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर जि. पं. सीईओ राहुल शिंदे, जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, बँक ऑफ बडोदाचे अश्विनकुमार, संकनगौडा बिराजदार यासह विविध शिक्षक संघांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत आणि गौरवगीत सादर केले. जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी हिरेमठ यांचा नुकतीच जिल्हा शिक्षणाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
जि. पं. सीईओ राहुल शिंदे म्हणाले, प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करणाऱ्या शिक्षकांचे कार्य मोठे आहे. स्वातंत्र्यानंतर शिक्षण पद्धतीत बरेच बदल झाले आहेत. जिल्हा पंचायततर्फे शिक्षण विभागातील समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दीपप्रज्वलन आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी बेळगाव जिल्हास्तरीय आणि शहर स्तरावरील प्रतिभा कारंजी आणि कला उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच निवृत्त शिक्षकांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील शिक्षक कल्याण निधीअंतर्गत 21 तर इतर 26 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.