शैक्षणिक सहलींना सुरुवात
कागल आगारात 10 डिसेंबरपर्यंत सहलीचे बुकिंग हाऊसफुल्ल
कोल्हापूर :
शैक्षणिक सहल या उपक्रमाला विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत विशेष महत्व आहे. आपल्या शालेय जीवनातील शैक्षणिक सहलीतील सहभाग हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय क्षण असतो. उपक्रमशिल शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीचा लाभ देण्यामध्ये स्पर्धा असते. त्यातून सहलींचे बुकिंग करण्यात येते. कागल आगाराच्या सहलीसाठी बसेस आता 10 डिसेंबरपर्यंत फुल्ल आहेत.
दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींचे दरवर्षी आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधूनच विद्यार्थ्याच्या सहली काढणे शिक्षण विभागाने बंधनकारक केले आहे. सवलतीच्या दरात सहलीकरिता विद्यार्थ्यासाठी बसेस पुरविण्याचे काम एस. टी. महामंडळ करते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान शाळांची एस. टी. महामंडळाकडे बसचे बुकिंग केले जाते. कागल आगारातही तालुक्यातील शाळांसह करवीर पूर्व हातकणंगलेसह इतर गावातील शाळांनी सहलीकरिता बस बुकिंग केले जाते.
बसेसची संख्या कमी झाल्याने दररोज चार बसेस सहलीसाठी दिल्या जात आहेत. यंदाच्या मोसमातील पहिली सहल 15 नोव्हेंबर रोजी खेबवडे हायस्कूलची गेली. तर 25 नोव्हेंबर रोजी दूधगंगा विद्यालयाच्या 3 बसेस घेऊन औरंगाबाद येथे सहल गेली आहे. आत्ता कागल आगाराच्या दहा डिसेंबरपर्यंत बसेस सहलीसाठी बुक झाल्या आहेत. मात्र गाड्यांची कमतरता असल्याने दररोजचे नियोजन करून रोज चार गाड्या सहलीसाठी देण्यात येत आहेत.
दरम्यान 11 ते 15 डिसेंबर अखेर संभाजीनगर येथील यात्रा असल्याने बसेस संभाजीनगर डेपोला जाणार आहेत. त्यामुळे या काळात सहलीसाठी बसेस उपलब्ध असणार नाहीत. याव्यतिरिक्त शाळांनी सहलीसाठी कागल आगाराकडे बसेस बुकिंग करून सहकार्य करावे, असे आवाहन कागल आगारातर्फे करण्यात आले आहे.