For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वसतिगृहांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

10:31 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
वसतिगृहांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
Advertisement

मागणीनुसार वसतिगृहे नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल : 70 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी वसतिगृहापासून वंचित

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वसतिगृहे उपलब्ध नसल्याने प्रत्येक वर्षी हजारो विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. अर्ज करण्यात येणाऱ्या 70 टक्केपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भौगोलिकदृष्ट्या राज्यात सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार वसतिगृहे उपलब्ध नसल्याने हजारो विद्यार्थ्यांना वसतिगृहापासून वंचित राहावे लागत आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा अधिकांश वेळ बस प्रवासामध्येच वाया जात आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत आहे.

मागासवर्गीय कल्याण खात्याच्या बेळगाव तालुका वसतिगृहामध्ये 2022-23 मध्ये 5737 विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केला होता. त्यापैकी 2298 जणांना याचा लाभ मिळाला आहे. तर 3439 विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले आहे. 2023-24 मध्ये 5839 अर्ज करण्यात आले होते. यापैकी 2611 विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळाले असून 3228 विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागले. अशा प्रकारे जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये असणाऱ्या वसतिगृहांमध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहे उपलब्ध होत नसल्यामुळे प्रत्येक वर्षी 20 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. समाज कल्याण खात्याच्या मॅट्रिकपूर्व वसतिगृहांमध्ये 2024-25 साठी 6834 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 3797 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून 3037 विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले. सरकारकडून शिक्षणासाठी महत्त्व देण्यात येत असले तरी सुविधांअभावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे.

Advertisement

आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न

विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी भाडेतत्त्वावर इमारती घेतल्या जात आहेत. सरकारच्या नियमानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- रामनगौडा कन्नोळी, समाज कल्याण खात्याचे सहसंचालक

Advertisement
Tags :

.