For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जि.प. कुणकेरी शाळेची नरेंद्र डोंगरावर शैक्षणिक क्षेत्रभेट

06:00 PM Jun 20, 2026 IST | अनुजा कुडतरकर
जि प  कुणकेरी शाळेची नरेंद्र डोंगरावर शैक्षणिक क्षेत्रभेट
Advertisement

ओटवणे । प्रतिनिधी

Advertisement

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेरी नं. १ येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले .सावंतवाडी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांच्या विशेष सहकार्याने विद्यार्थ्यांना सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगर परिसरात नेण्यात आले.या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी वनसफारीचा मनमुराद आनंद घेतला. नरेंद्र डोंगरावरील समृद्ध जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेताना विविध पक्ष्यांचे किलबिलाट, प्राण्यांचे आवाज आणि निसर्गातील विविध घटक विद्यार्थ्यांनी जवळून अनुभवले. पाठ्यपुस्तकात वाचलेली अनेक माहिती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली.नरेंद्र डोंगरावरील सुशोभित उद्यानात विद्यार्थ्यांनी विविध खेळांचा आनंद घेतला. तसेच तेथील टेहळणी बुरुजावरून सावंतवाडी शहर व परिसराचे विहंगम दृश्य पाहताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. निसर्ग माहिती केंद्राला भेट देऊन विद्यार्थ्यांनी विविध वन्यप्राणी, पक्षी, वृक्षसंपदा तसेच पर्यावरण संवर्धनाविषयी माहिती जाणून घेतली. केंद्रामध्ये प्रदर्शित करण्यात आलेले विविध प्राण्यांचे नमुने व पुतळे विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरले.वनसफारीच्या विशेष वाहनातून प्रवास करताना विद्यार्थ्यांना सावंतवाडी परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, डोंगररांगा आणि वनसंपदा जवळून पाहण्याची संधी मिळाली. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि निरीक्षण कौशल्य विकसित होण्यास मदत झाली.या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वनविभागाचे वनरक्षक श्री. मोहन घुटुकडे, गावडे काका आणि वाहनचालक श्री. कृष्णा पारधी यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक सहल संस्मरणीय ठरली.विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षणाची उत्तम संधी मिळत असल्याची भावना व्यक्त केली. शाळेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला.

Advertisement
Advertisement
Tags :

.