'शिक्षण'च्या अधिक्षकांना चाकूच्या धाकाने लुबाडले
मिरज :
जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या अधिक्षकांसह त्यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुबाडण्यात आले. महिलेच्या गळ्याला चाकू लावून रोकड, दागिने, मोबाईल, घड्याळ व पाकिटासह दोन लाख, 19 हजार ऊपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी शिक्षण अधिक्षक नारायण विष्णू माळी (वय 39, रा. माहेश्वर मंगल कार्यालयाजवळ, लिमये रोड, सांगली) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात तिघा लुटाऊंवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास नारायण माळी हे पत्नीला सोबत घेऊन चारचाकीतून मिरजेकडे येत होते. सोलापूर-कोल्हापूर महामार्गालगत कृष्णाघाट सेवा रस्त्यावऊन येत असताना ते रस्त्याकडेला थांबले होते. यावेळी अनोळखी तिघेजण त्यांच्या चारचाकीजवळ आले. त्यांनी नारायण माळी यांची पत्नी बसलेल्या ठिकाणी जावून चारचाकीचा दरवाजा उघडला. त्यांच्या गळ्याला चाकू लावून धमकावले. नारायण माळी यांनाही हत्यारांचा धाक दाखवला.
पत्नीच्या गळ्यातील 30 हजार ऊपयांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, 90 हजार ऊपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, 30 हजारांची हिरे व सोन्याची अंगठी, चार हजारांचे घड्याळ, 50 व 15 हजारांचे दोन मोबाईल, पाकिट व त्यातील ओळखपत्रे असा दोन लाख, 19 हजार ऊपयांचा मुद्देमाल लुबाडून संशयीत तिघे पसार झाले.
हत्यारांचा धाक दाखवून लुबाडणूक झाल्यामुळे नारायण माळी व त्यांच्या पत्नी घाबरले होते. त्यांनी तशीच आपली चारचाकी महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्यात नेली. पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगून तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात तिघा लुटाऊंवर गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षण विभागाच्या अधिक्षकांनाच भरदिवसा लुबाडण्यात आल्याच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. महामार्गालत प्रवाशांना लुबाडणाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधीत लुटाऊ स्थानिक आहेत की बाहेरचे? याचा शोध घेण्यात येत आहे. लवरकच लुटाऊंना जेरबंद केले जाईल, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पथके रवाना, सीसीटीव्ही तपासणी सुरू
अधिकाऱ्याची लुटमार झाल्याच्या घटनेची पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनीही गंभीर दखल घेतली आहे. ते स्वत: तपास कामासाठी सक्रिय झाले असून, शहर, गांधी चौकी पोलिसांसह स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस पथक तपास कामी नियुक्त केले आहे. या पथकाकडून कृष्णाघाट रस्त्यावरील विविध ठेकाणांचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. याशिवाय महामार्गावरील सीसीटीव्ही तपासणी सुरू आहे. रेकॉर्डवरील चोर व दरोडेखांराचा शोध घेऊन चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.