शिक्षणाधिकारी लोहार यांच्याकडे 6 कोटींचे घबाड ? एसीबीची कारवाई
वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार हे पुन्हा चर्चेत आले असून किरण लोहार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे एकूण सहा कोटी रूपयांची मालमत्ता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जगासमोर आणली आहे. इसीबीच्या या कारवाईनंतर किरण लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.
मागील वर्षी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रणजितसिंह देसले यांची रजा नाकारल्याने किरण देसले चर्चेत आले होते. युनेस्को व लंडनमधील वार्की फाऊंडेशनच्या सात कोटी रूपयांच्या ग्लोबल शिक्षक पुरस्काराने सन्मानित झालेले. सोलापूरातील शिक्षक रणजितसिंह डिसले हे त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी गैरहजर राहील्याने तसेच देसले यांनी अमिरिकेतील संशोधनासाठी मागितलेली रजा नाकारली होती. त्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टिकेची झोड उठवली होती. या प्रकरणानंतर किरण लोहार एका शिक्षणसंस्थाचालकाकडून लाच घेताना लाचलुचपत विभागाला रंगेहात सापडले होते.
तत्पुर्वी कोल्हापूरातही सेवेत असणारे किरण लोहार कोल्हापूर एसीबीलाही अशा प्रकारे लाच घेताना सापडले होते. त्यानंतर त्यांची सोलापूरला बदली केली होती.
नेहमी वादग्रस्त प्रकरणात अडकलेल्या किरण लोहार यांची एसीबीने चौकशी लाऊन त्यांच्या मालमत्तेची खुली चौकशी सुरु केली. १५ नोव्हेंबर १९९३ ते दि. ३१ आॕक्टोंबर २०२२ या निरीक्षण कालावधीत लोहार कुटुंबीयांकडे कायदेशीर ज्ञात मालमत्तेपेक्षा ११२ टक्के जास्त मालमत्ता आढळली. तसेच ती भ्रष्ट आणि अवैध मार्गाने मिळविलेली आहे यावरही शिक्कामोर्तब झाले.
एकूण पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रूपयांच्या या संपत्तीमध्ये शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना त्यांच्या पत्नी सुजाता आणि मुलगा निखिल (सर्वजण रा. पाचगाव, ता. करवीर) यांनी प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.