आज शिक्षण अवघड नाही, परिस्थितीवर रडत बसू नका!
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे विद्यार्थ्यांना ऊर्जात्मक आवाहन: दै. तरुण भारत, टीजेएसबी बँकेच्या कार्याचे केले कौतुक
पणजी : शिक्षणाशिवाय माणूस समृद्ध होऊ शकत नाही. परंतु आजच्या युगात शिकत असताना आपल्याला वेगळे काय करायचे आहे, हे अगोदर विद्यार्थ्यांनी ठरवायला हवे. परीक्षा कोणतीही असो, तुम्ही जर एखादे ध्येय बाळगले आणि ते पूर्ण करण्यासाठी झटत असाल तर तुम्ही कोणतीही परीक्षा निश्चितच उत्तीर्ण होणार. आज शिक्षण घेणे अवघड नाही. परिस्थितीवर कधीच रडत बसू नका. मी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणार नाही. मी माझ्या कार्यकाळात ‘मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना’ सुरू केली आहे. त्याचा लाभ घेऊन उद्याचे सशक्त नागरिक बना, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दै. तरुण भारत आणि टीजेएसबी बँक यांच्यावतीने आयोजित गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. हा कार्यक्रम इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात काल, सोमवारी घेण्यात आला. यावेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, तऊण भारतच्या कार्यकारी संचालिका सई ठाकुर बिजलानी, टीजेएसबी बँकेचे मुख्य अधिकारी शरद गांगल, कर्नाटक आणि गोवा प्रांताचे बँक अधिकारी अरुण भट, दै. तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर, सरव्यवस्थापक सचिन पोवार उपस्थित होते. या कार्यक्रमात सुमारे दीडशेहून अधिक दहावीतील गुणवंतांना टीजेएसबी बँक आणि दै. तऊण भारत यांच्यावतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षण, देशसेवेकडे दुर्लक्ष नको
संपादक सागर जावडेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी पालकांनी प्रयत्नरत रहायला हवे, असे सांगितले. त्याचबरोबर मुलांनीही आपल्या पालकांचा, गुरुजनांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी शिक्षणात सर्वात पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत. हे करीत असताना आपला देश आणि देशसेवा याकडेही दुर्लक्ष करता कामा नये, याविषयी मार्गदर्शन केले.
समाजाचा पाठिंबा विसरू नका : श्रीपाद नाईक
स्वप्ने पूर्ण करताना नेहमी जागृत असणे फार गरजेचे आहे. कारण जागृत राहिल्याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाही. त्यासाठी कोणतेही आव्हान असो ते मात करण्यासाठी शिक्षणातील गुणवत्ता सिद्ध करा. सकारात्मक शिक्षण आणि संस्कार यांची जोड जीवनातील मार्ग यशस्वी करतो. त्यामुळे उत्तम शिक्षण आणि पालक, गुऊजनांकडून मिळालेले संस्कार यांना कधीच विसरू नका. कारण शिक्षण कितीही घेतले तरी आपल्याला गुऊजन, पालक, समाज, राज्य आणि देशाच्या योगदानाला विसरता कामा नये. कारण आपला मार्ग यशस्वी करण्यासाठी समाजाने दिलेली साथ आणि पाठिंबा कधीही विसरता कामा नये, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
यशस्वी होण्याची पोटात आग हवी : शरद गांगल
जीवन कसे जगावे हे शिक्षण शिकवते. आता तुम्ही दहावीनंतर महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. जागतिक व्यवस्था बदलली आहे. जागतिकीकरण मागे पडत आहे. जगात दररोज काय चालले आहे, त्याचे अवलोकन करा. परीक्षेची भीती बाळगू नका. तुमची ज्ञानसंपादनाची भूक खूप मोठी आहे. तुमची प्रतिभा नेहमी जीवंत ठेवावी. यशस्वी होण्याची पोटात आग हवी. तरच तुमच्या जीवनाला अर्थ आहे. शिक्षण घेताना आपण, देशासाठी, समाजासाठी चांगले कार्य करायचे आहे, हे विसरू नये. आज प्रत्येकाने शिक्षण घ्यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून देशाचे भवितव्य पाहत आहेत. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनीही अमेरिकेने भारताला सुपर कॉम्प्युटर देण्यास नकार दिल्यानंतर भारतातील सर्व लोकांपर्यंत सुपर कॉम्प्युटर कसा पोहचेल, हे ध्येय बाळगले. त्याप्रमाणेच तुम्ही देशासाठी नेहमी कार्यरत राहण्यासाठी शिक्षण घ्या, असा सल्ला टीजेएसबी बँकेचे मुख्य अधिकारी शरद गांगल यांनी सांगितले.
मुलांशी सकारात्मक चर्चा करा : सई ठाकुर बिजलानी
दहावीमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कष्ट हे कौतुकास्पद आहेत. परंतु यामागे आई-वडिलांची मुलांविषयीची चिंता, हाल अपेष्टा आणि धावपळ ह्याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणून मुलांनी दहावीचा पाया घट्ट रोवल्यानंतर पुढील शिक्षण घेताना आपले गुऊजन, पालक यांना विसरता कामा नये. पालकांनीही मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण देण्याबरोबरच मुलांशी नेहमी सकारात्मक चर्चा करायला हवी. मुलांवरील ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना त्यांचे करिअर ठरविण्यासाठी सहकार्य करायला हवे, असे मत तऊण भारतच्या कार्यकारी संचालिका सई ठाकुर बिजलानी यांनी व्यक्त केले.