शेतकऱ्यांच्या विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे
प्रा. डॉ. देवकुमार अहिरे यांचे प्रतिपादन : ज्योती महाविद्यालयात महात्मा जोतिराव फुले व्याख्यानमाला
बेळगाव : महात्मा जोतिबा फुले यांनी स्वत: फिरून व थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ लिहिला. त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान व त्यांच्या बचावासाठी ग्रंथ लिहिला आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्या महत्त्वाची आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये विद्वान निर्माण केले पाहिजेत. शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक व शैक्षणिक क्रांतीसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली, असे प्रतिपादन प्रा. डॉ. देवकुमार अहिरे यांनी केले.
ज्योती महाविद्यालयात शुक्रवारी छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ (साप्ताहिक राष्ट्रवीर), द. म. शि. मंडळ व सह्याद्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतिराव फुले व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर द. म. शि. मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, सह्याद्री सोसायटीचे चेअरमन पी. पी. बेळगावकर, व्हा. चेअरमन किरण पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सचिव विक्रम पाटील यांनी तर प्राचार्य एम. व्ही. शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
शेतकऱ्यांबाबत धोरणे ठरविताना त्यांची मते जाणून घ्या
अहिरे म्हणाले, 19 व्या शतकात शेतकऱ्यांचे शोषण करण्यात येत होते. या विषयावर महात्मा जोतिबा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा आसूड’ ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांच्या धोरणांमुळेच देशातील शेतकऱ्यांसह अनेकांना दुष्परिणामांना सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांबाबत धोरणे ठरविताना त्यांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे असून, महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी काय करावे? याबाबत ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांबद्दलचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावेत
महात्मा जोतिबा फुले यांनी ग्रंथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक चिंतन करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत सांगितले आहे. यासाठी त्यांचे ग्रंथ आत्मसात करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक विचार तळागाळापर्यंत पोहोचला असता तर शेतकरी आत्महत्या घडल्या नसत्या. यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांबद्दल व्यक्त केलेले विचार प्रत्येकाने आत्मसात करावेत, असे आवाहन अहिरे यांनी केले.
अध्यक्षीय भाषण करताना राजाभाऊ पाटील यांनी, महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांबद्दल कार्यतत्पर राहून त्यांच्या विकासासाठी सदैव कार्य केले. महात्मा जोतिबा फुले यांनी शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक व सामाजिक क्रांतीसाठी अखंडपणे काम केले. त्यांचे विचार आपण सर्वांनी आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवर, प्राध्यापक, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. किरण पाटील यांनी आभार मानले.
डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे आज व्याख्यान
महात्मा जोतिबा फुले व्याख्यानमालेंतर्गत शनिवार दि. 29 रोजी दुपारी 4 वाजता डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे व्याख्यान होणार आहे. ‘भविष्यवेधी शिक्षण आणि शिक्षकाची भूमिका’ या विषयावर ते बोलणार आहेत. त्यांचा परिचय पुढीलप्रमाणे- त्यांनी शिवाजी विद्यापीठ येथे परीक्षा नियंत्रक म्हणून तसेच डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल युनिव्हर्सिटी येथे व संजय घोडावत विद्यापीठ येथे कुलसचिव म्हणून, सिम्बॉयोसिस पुणे येथे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. स. म. शंकरराव मोहिते पाटील कॉलेज येथे प्राचार्य म्हणून काम केले आहे. वरिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात. अनेक शैक्षणिक कार्यशाळा, परिषदा येथे मार्गदर्शन करतात. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, कला, क्रीडा, स्पर्धा परीक्षा, रोजगार अशा अनेक विषयांवर पंधराशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत.