शिक्षण विभागाकडून पालक-शिक्षक महासभेचे आयोजन
सर्व सरकारी शाळांमध्ये एसडीएमसी कमिटीसह बैठक
बेळगाव : बालदिनाचे औचित्य साधून शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक सरकारी शाळेमध्ये शुक्रवारी पालक-शिक्षक महासभेचे आयोजन केले होते. या दरम्यान एसडीएमसी कमिटीसह अन्य पालकांना शाळेमध्ये राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच पालकांची जबाबदारी काय? याचीही माहिती देण्यात आली.
आपला विद्यार्थी शाळेमध्ये काय करतोय, याची माहिती पालकांना होण्यासोबतच शिक्षकांबरोबर पालकांचा संवाद साधला जावा यासाठी शुक्रवारी पालक-शिक्षक महासभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये शुक्रवारी ही सभा घेण्यात आली. या सभेवेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, एसडीएमसी कमिटी तसेच पालक यांना सहभागी करून घेण्यात आले होते.
बऱ्याच पालकांना आपला विद्यार्थी काय करतो, याविषयी माहिती नसते. त्याची शैक्षणिक प्रगती जाणून घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. शुक्रवारी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातही सर्वच सरकारी शाळांमध्ये पालक-शिक्षक महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एसडीएमसी कमिटीने आपल्या सूचना शिक्षकांसमोर मांडल्या. तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबतची माहिती दिली.