समस्यांचे निराकरण करण्यासाठी शैक्षणिक अदालत
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची माहिती : शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : शिक्षकांनी मुलांना शासकीय सोयी-सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांच्या अभ्यासावर लक्ष द्यावे. शिवाय समस्यांचे निराकरण करण्यासाठी दर तीन महिन्यांनी एक शैक्षणिक अदालत घेतली जाणार आहे, असे विचार जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी मांडले. मंगळवारी जि. पं. कार्यालयात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. शैक्षणिक कार्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शिक्षण अदालत भरविली जात आहे. हा एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे. शैक्षणिक कार्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दर तीन महिन्यांनी शिक्षण अदालत घेतली जाणार आहे. या माध्यमातून अडचणी दूर केल्या जाणार आहेत, असेही सीईओ शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी 26 प्रलंबित समस्यांपैकी 8 समस्यांचे निराकरण करण्यात आले. उर्वरित समस्याही निकालात काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी डीडीपीआय लीलावती हिरेमठ, जि. पं. लेखाधिकारी शीतल कुरणी यांसह गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण खात्यातील अधिकारी, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.