For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिक्षण, व्यवहार ज्ञान आणि करियर

06:50 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिक्षण  व्यवहार ज्ञान आणि करियर
Advertisement

फार्मास्युटीकलची पदवी घेतल्यानंतर फार्मा कंपनीमध्ये काम मिळू शकते का? आय.टी. इंजिनिअरींग केलेल्या पदवीधारकांना आय.टी. इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने काम केले जाते याची माहिती असते का? कॉमर्स पदवीधारकाला बँकेत केल्या जाणाऱ्या कामकाजाची कितपत माहिती असते? चार्टर्ड अकाउंटंट पदवी घेऊन काम शोधणाऱ्या युवक-युवतीला मुलाखतीमध्ये झालेल्या व्यवहाराच्या एन्ट्री कशा लिहाव्या हे सांगता येते का? सायन्स पदवीधारकाला संशोधन कशा पद्धतीने करतात, शास्त्रज्ञ नेमके कशा पद्धतीने काम करतात याची जुजबी माहिती असते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अर्थात नकारार्थी आहेत. याचे कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आहे तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्येही आहे.

Advertisement

कॉमर्स पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला. दहा हजार रुपये बँकेत दोन वर्षांच्या कालावधीसाठी ठेवल्यावर नेमके किती रुपये मिळू शकतील याचे उत्तर वही-पेन अथवा मोबाईल-लॅपटॉपच्या मदतीशिवाय सांगा.  यावर दोन-तीन वर्षात दुप्पट पैसे मिळतील अशी उत्तरे मिळाली. बँकेत पैसे ठेवल्यावर पैसे दुप्पट होणारच, फक्त दोन वर्षात की तीन वर्षात याबद्दल त्यांचे मतभेद होते. वर्गातील पन्नास विद्यार्थी-विद्यार्थिनींपैकी कितीजण बँकेत गेले आहेत, या प्रश्नावर अनेक विद्यार्थ्यांचे चेहरे असे होते की, बँकेत जाण्याची आवश्यकता काय? बँकेमध्ये वारंवार जाऊन तिथले कामकाज समजून देण्या-घेण्याचा प्रयत्न महाविद्यालये करत नाहीत तसेच विद्यार्थी -विद्यार्थिनींमध्ये याबाबत अनास्था दिसून येते. तरीही अशा विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकौंटंट होण्याची स्वप्ने पडत असतात.  कॉमर्सच्या पाच वर्षांच्या पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये बँका, इन्शुरन्स कंपन्या  म्युच्युअल फंड कंपन्यांना भेट देऊन तिथे काम करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा उपक्रम किती महाविद्यालये हाती घेतात? अर्थात पुस्तकी शिक्षण आणि त्याचा रोजच्या व्यवहारातील वापर यामध्ये तफावत यापूर्वी होती आणि पुढेही राहील.  परंतु त्याकरिता विद्यार्थ्यांकडून विशेषत्वाने प्रयत्न व्हायला हवेत

सायन्स पदवी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रि वॉक’, अंबोलीसारख्या निसर्गरम्य ठिकाणी ‘बेडकांच्या वैविध्याचा अभ्यास करण्यासाठी पावसाळी सहल’, आयसर (पुणे) सारख्या संस्थेला भेट, नॅशनल केमिकल लॅब (पुणे), दापोलीचे कृषी विद्यापीठ बघण्याचा उपक्रम हाती घेतल्याशिवाय त्या विषयाची गोडी कशी निर्माण होईल? शिवाय त्या विषयामध्ये पारंगत झाल्यावर करियर करण्यासाठी अन्य कोणते कौशल्य अंगीकारावे लागेल, याची कल्पना कधी येणार? शेतीमध्ये काही करू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी जवळपासच्या खेडेगावामध्ये जाऊन पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये काही दिवस स्वयंस्फूर्तीने काम केल्यास शेतीमधील अनेक प्रयोग कसे केले जातात आणि पुढील काही वर्षामध्ये काय करता येईल, याचे ज्ञान मिळू शकते. करोनावरील लस शोधून काढण्यात सारा गिल्बर्ट या ऑक्सफोर्डच्या प्रोफेसरने कसे काम केले आणि त्यांच्या अथक प्रयत्नामुळे जगभरात लस तयार करण्यासाठी कसा उपयोग झाला, याची फार्मास्यूटीकल विभागामध्ये करियर करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असायला हवी. खरे तर सायन्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही लस कशी तयार केली आणि भारतामध्ये ‘सिरम’ने तो फॉर्म्युला कसा वापरला, याबद्दल उत्सुकता हवी.

Advertisement

महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता आजूबाजूला काय घडते आहे, याबद्दल प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे. कॉम्प्युटर क्षेत्रात इंजिनिअरींग करणाऱ्या वा करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने दर सहा महिन्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा कोर्स करून ते रोजच्या आयुष्यात वापरण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे प्रयत्न केले तरच आय.टी. क्षेत्रातील बदलांची इत्थंभूत माहिती मिळू शकते. आय.टी. इंजिनिअरींग केल्यावर पायथॉनचा तीन महिन्यांचा कोर्स केल्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यता वाढत नसते. कारण मुलाखत घेणारी व्यक्ती त्या तंत्राचा वापर कसा करायचा त्याबद्दल प्रश्न विचारते. बरेच ‘फ्रेशर’ पदवीधारक अशा प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नानुसार एQथ् तत्परतेने  लिहिणे अनेक पदवीधरांना शक्य होत नाही त्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही.

ऑटोमोबाईलमध्ये अनेक बदल होत आहेत. त्या क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नव्याने येणाऱ्या वाहनांमध्ये छोट्या सोयी-सुविधा कशा दिल्या जात आहेत, याबद्दल सजग राहणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी सेन्ट्रल लॉक करावे लागायचे परंतु आता कारने काही अंतर पार केल्यावर सेन्ट्रल लॉक आपोआप लागते. कारच्या काचा पूर्णपणे बंद करण्यासाठी आता बटणावर हलकेच दाबले तर काम फत्ते होते. ब्लू टूथने मोबाईल कारला जोडला गेला असल्यास कार बंद करताच, मोबाईल कारमध्ये विसरू नये असा मेसेज क्रिनवर दिसतो. टायरमध्ये हवेचे प्रेशर कमी असल्यास आता कारमध्ये तसा मेसेज क्रिनवर दाखवला जाईल,  हेड लाईट सुरु असताना कार लॉक होऊ शकणार नाही. अशा अन्य कोणत्या सुविधा देता येतील यावर विचार करू शकणाऱ्या व्यक्तीस नोकरी मिळण्याची चिंता करावी लागणार नाही.

इलेक्ट्रॉनिक्समध्ये करियर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी घरच्या टिव्हीवर अशा कोणत्या सुविधा देता येतील, यावर विचार करायला हवा. हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळे पदार्थ नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्याच्या कलेबरोबरच दुसऱ्या तिसऱ्या वेळी येणाऱ्या ग्राहकाची आवड निवड लक्षात ठेवायला हवी.  सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये करियर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतीला ग्राहकांची मानसिकता समजून घेता यावी, अशी अपेक्षा असते. मार्केटिंगमध्ये एम.बी.ए. केल्यामुळे मार्केटिंग येते हा एक रूढ गैरसमज आहे. त्यामध्ये दोन वर्षे घालवण्यापेक्षा प्रत्येक उन्हाळी सुट्टीमध्ये कोकणातून आणलेले आंबे विकण्याचा अनुभव गाठीशी असल्यास विक्रीचे तंत्र समजते.

आता अनेक महाविद्यालये स्वायत्त झाल्यामुळे अनेक महाविद्यालयांनी पदव्यांची नावे बदलली आहेत परंतु अभ्यासक्रमामध्ये फार अमुलाग्र बदल केलेला नाही.  अर्थात फीमध्ये भरघोस वाढ झाल्यामुळे वेगळी पदवी मिळवण्याचा आभास निर्माण होतो. कॅम्पसमध्ये येणाऱ्या कंपन्या कोणत्या यांची नावे या महाविद्यालयांच्या वेब साईटवर अभिमानाने लावलेली असते. परंतु पुस्तकी ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग माहित नसेल, क्रमिक पुस्तकाला संदर्भ पुस्तकांच्या वाचनाची जोड दिलेली नसेल, रोजच्या वृत्तपत्रांचे नियमित वाचन करून त्यावर मत व्यक्त करता येत नसेल तर नोकरी मिळण्याची शक्यता कमी होते. त्यासाठीच महाविद्यालयीन शिक्षणात उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीत पैसे मिळवण्याचे (अधिकृत) उद्योग केल्यास काही अनुभव गाठीशी येऊ शकतो. कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये करियर करू इच्छिणाऱ्या युवकास सेकंड हँड लॅपटॉप मिळवून त्याचे प्रोसेसर बदलणे सहज शक्य आहे. इलेक्ट्रिक / इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिकणाऱ्या युवतीने जवळपासच्या घरातील उपकरणे दुरुस्तीची कामे करण्यास सुरुवात केल्यास अनुभव मिळेल. ब्युटी पार्लरचा कोर्स करणाऱ्या युवतीने शिक्षण घेता घेता मिळतील ती कामे कमीत कमी दरामध्ये केल्यास व्यावहारिक ज्ञान मिळेल. कॉमर्सच्या पदवीधारकाने ओळखीतल्या ज्येष्ठ व्यक्तींचे इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरून देण्याची कामे केल्यास किमान आयकराचा हिशेब कसा केला जातो ते तरी कळेल.

पदवी शिक्षण घेता घेता पदवीला व्यवहार ज्ञानाची जोड देण्यासाठी काही कामे वीना-मोबदला / कमी मोबदल्यामध्ये करून अनुभव गाठीशी बांधणाऱ्या युवक-युवतीना नोकरीसाठी वणवण भटकावे लागत नाही. त्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या योजनेमध्ये प्रत्येक युवक-युवतीने सहभागी व्हायला हवे. आपल्या पाल्यांना सुट्टीमध्ये असे उद्योग स्वत:च्या हिमतीवर पण कमीत कमी भांडवलावर करण्यासाठी घराबाहेर पाठवणाऱ्या पालकांची संख्या कमी होत आहे, ही सगळ्यात चिंतेची बाब आहे.

सुहास किर्लोस्कर

Advertisement
Tags :

.