उत्सवापूर्वी खाद्यतेलाची आयात विक्रमी स्तरावर
सॉल्वंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया : 15.7 लाख टन तेलाची आयात
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ऑगस्ट महिन्यामध्ये खाद्य तेलाची आयात सर्वाधिक झाली आहे. उत्सवी हंगामापूर्वी तेलाचा पुरेसा साठा करण्यावर अनेकांचा भर दिसून आला आहे. ऑगस्टमध्ये भारताने मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात केली आहे. खाद्यतेलाची आयात मासिक स्तरावर पाहता दीड टक्के वाढली आहे. एकंदर 15.7 लाख टन इतक्या खाद्यतेलाची आयात करण्यात आली आहे.
उत्सवी काळासाठी खाद्यतेलाची मागणी अधिक राहत असल्यामुळे अनेकांनी खाद्यतेलाचा साठा करण्यावर भर दिला होता. सॉल्वंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी खाद्यतेलाच्या आयातीसंदर्भात माहिती दिली आहे. मागच्या मोसमापेक्षा यंदाच्या हंगामात 6 लाख टन इतकी जादा खाद्यतेलाची आयात केली गेली आहे. ऑगस्ट 2026 मध्ये देशात एकंदर 15.72 लाख टन इतक्या खाद्यतेलाची आयात करण्यात आली आहे. जुलैमध्ये 15.50 लाख टन खाद्यतेलाची आयात करण्यात आली होती. त्या तुलनेत ऑगस्टमध्ये 22 हजार टन जास्त आयात करण्यात आली आहे. अर्थात ऑगस्ट 2025 मध्ये भारताने 16.79 लाख टन इतक्या खाद्यतेलाची आयात केली होती.
10 महिन्यात 136.20 लाख टन
चालू बाजार हंगामानुसार सुरुवातीच्या 10 महिन्यांमध्ये म्हणजेच नोव्हेंबर 2025 ते ऑगस्ट 2026 या दरम्यान भारतात 136.20 लाख टन इतक्या खाद्यतेलाची आयात झाली आहे. 2024-25 हंगामामध्ये 130.25 लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती. त्या तुलनेत खाद्यतेलाची आयात 6 लाख टन अधिक झाली आहे.
रिफाइंड, सोयाबीन, पाम तेलाची आयात
यामध्ये रिफाइंड खाद्यतेलाची आयात 16.36 लाख टन ऐवजी घसरुन 6.59 लाख टन इतकी झाली आहे. दुसरीकडे कच्च्या खाद्यतेलाच्या आयातीत वाढ झाली असून ते 129.61 लाख टनवर पोहोचले आहे. जे मागच्या हंगामात 113.88 लाख टन इतके होते. सोयाबीन आणि पाम तेलाची आयातसुद्धा वाढलेली दिसून आली. मागच्या महिन्यात पाम तेलाची आयात 7 टक्के वाढत 782761 टन इतकी होती. यामध्ये पामतेलाच्या मागणीने चांगला आधार दिला. सोयाबीन तेलाची आयात 26 टक्के वाढत 628736 टन इतकी झाली होती. सूर्यफुलाच्या तेलाची आयात मात्र घसरलेली दिसून आली. हे तेल 36 टक्के घसरणीसह 160639 टन इतके आयात झाले.
10 दिवसांचा उशीर
भारतात मोठ्या बंदरांमधून जहाजामार्फत मालाचा पुरवठा होण्याला जवळपास 10 दिवसांचा उशीर होत असल्याचे कारण समोर आले आहे. हा होणारा उशीर लक्षात घेऊन देशातील रिफायनर कंपन्यांनी खाद्यतेलाची आयात आगाऊ खरेदी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.