खाद्यतेल सात रूपयांनी स्वस्त
सांगली :
गेल्या महिन्याभरात तेलाचे दर सहा ते सात रूपयांनी कमी झाले आहेत. उन्हाळा असला तरी भाज्यांचे दर सर्वसामान्यांना पडरवडणारेच आहेत. गवार मात्र भावातच असून किलोचा दर शंभर रूपयांवर आहे. फोडणीसाठी लागणाऱ्या लसणाचा दरही कमालीचा कमी झाला असून होलसेलमध्ये ७० ते ८० रूपये किलो लसूण झाला आहे.
तेलाच्या दरात महिन्यात थोडीफार घसरण झाली आहे. एक फेब्रुवारी रोजी आणि आताच्या दरात शेंगतेल वगळता सर्वच खादय तेलाचे दर सात ते आठ रूपयांनी कमी झाले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात सरकी तेलाचा किलोचा दर १४६ रूपये होता, तो आता १५२ रूपये झाला आहे.
सोयाबीन १४६ होते ते आता १५२ झाले आहे. सूर्यफुल १५६ होते ते आता १६४ झाले आहे. शेंगतेल मात्र उतरले असून ते १६८ होते ते आता १६४ इतके झाले आहे.
उन्हाळ्याचे दिवस असूनही अद्याप भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातच आहेत. गवार भावातच असून किलोचा दर शंभर रूपयांवर आहे. वांगी २० ते ३०, बटाटा २० ते ३०, कांदा २० ते ३५, कारली ३० ते ४०, दोडका ४० ते ५०, मिरची ५० ते ६०, घेवडा ५० ते ६० रू दर आहे. पालेभाज्याही स्वस्तच असून मेथीची पेंडी १०, शेपु १०, तांदळ १०, कोंथिबीर पाच ते दहा, तर कोबी आणि फ्लॉवर दहा रूपये गड्डा आहे.
- कांदा स्थिर, लसूण झाला स्वस्त
महिन्याभरात कांदयाचे दर स्थिर आहेत. होलसेलमध्ये कांदयाचा सरासरी दर २० ते २५ रूपये आहे. नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने दरात घसरण होण्याची शक्यता आहे. कांदा स्थिर असताना चारशे रूपये पार केलेला लसणाचे तर मात्र कमी झाले आहेत. सध्या किलोचा दर शंभराच्या खाली आले आहेत. नवीन लसूण बाजारात आल्याने दर कमी होत आहेत. या दरात आणखी घरसण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.