ईडीकडून 100 कोटींची मालमत्ता जप्त
मुडा गैरव्यवहार प्रकरणी कारवाई : बेकायदा मंजूर केलेल्या 92 भूखंडांवर टाच
प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) बेकायदा भूखंड वाटप करणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती, मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी यांच्यासह अनेकांवर आरोप झाले होते. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तपास करून 2002 च्या मनी लॉन्ड्रिंग नियंत्रण कायद्यांतर्गत 100 कोटी रुपये किमतीच्या 92 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
मुडा प्रकरणातील गैरव्यवहाराचा तपास केल्यानंतर अनेक महत्वाचे धागेदोरे ईडीच्या हाती लागले. याच्या आधारे यापूर्वी 300 कोटी रु. बाजारमूल्य असणारे 160 भूखंड ईडीने जप्त केले होते. त्यानंतर कारवाईचा पुढील भाग म्हणून 100 कोटी रु. किमतीच्या 92 भूखंडांवर तात्पुरती जप्ती आणण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता गृहनिर्माण सहकारी संघ आणि मुडातील अधिकाऱ्यांसह प्रभावी व्यक्तींच्या नावे नोंदणी करण्यात आल्या होत्या, असे ईडीने म्हटले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या व इतरांविरुद्ध आयपीसी 1860 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या विविध कलमांतर्गत लोकायुक्त पोलिसांनी म्हैसूरमध्ये एफआयआर नोंदविले होते. याच्या आधारावर ईडीने मुडाच्या बेकायदा भूखंड वाटप करणाचा तपास सुरू केला होता. आता जप्तीच्या कारवाईमुळे मुडाने बेकायदेशीरपणे प्रभावी व्यक्तींना भूखंड मंजूर केल्याचे उघडकीस आले आहे.
प्रकरणात मुडाचे माजी आयुक्त जी. टी. नटेशकुमार यांच्यावर आरोप झाला होता. मुडाचे भूखंड मंजूर करण्यासाठी रोकड, बँकेतून रक्कम ट्रान्स्फर, स्थावर-जंगम मालमत्तांच्या स्वरुपात त्यांनी लाच घेतल्याचे पुरावे तपासावेळी जमा करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे.
स्नेहमयी कृष्ण यांची तक्रार केंद्रीय जागृती आयोगाकडून स्वीकृत
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) भूखंड वाटप प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे. परंतु, खोटा तपास अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला आहे, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्ण यांनी केंद्रीय जागृती आयोगाकडे तक्रार दिली होती. आयोगाने तीन दिवसांपूर्वी स्नेहमयी कृष्ण यांना मोबाईलवर संदेश पाठवून सदर तक्रार स्वीकृत करण्यात आली असून पडताळणीनंतर नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. मुडा गैरव्यवहारासंबंधी लोकायुक्त एडीजीपी मनीश कर्बिकर, आयजीपी सुब्रह्मण्येश्वर राव आणि तपास अधिकारी एसपी टी. जे. उमेश यांनी कर्तव्यात कसूर केली आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी तक्रार स्नेहमयी कृष्ण यांनी 12 मार्च रोजी केंद्रीय जागृती पथकाकडे दाखल केली होती.