For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गृहमंत्री परमेश्वर यांच्या शिक्षण संस्थांवर ईडीचे छापे

06:22 AM May 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
गृहमंत्री परमेश्वर यांच्या शिक्षण संस्थांवर ईडीचे छापे
Advertisement

तुमकूरमध्ये दोन तर बेंगळूरमध्ये एका ठिकाणी धाड : कागदपत्रांची पडताळणी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्य काँग्रेसमधील प्रभावी नेते व गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या मालकीच्या सिद्धार्थ शिक्षण संस्थांवर बुधवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. तुमकूर जिल्ह्यात दोन ठिकाणी तर बेंगळुरात एका ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून कादपत्रांची तपासणी केली.

Advertisement

बेंगळूरच्या नेलमंगल येथील टी. बेगूर जवळील सिद्धार्थ वैद्यकीय महाविद्यालय, तुमकूरच्या मरळूरमधील श्री सिद्धार्थ इंजिनिअरिंग कॉलेज आणि हेग्गेरेनजीकच्या सिद्धार्थ मेडिकल कॉलेजवर ईडीच्या पथकांनी एकाच वेळी छापे टाकले.

सकाळी 9 वाजता तुमकूरच्या एसएसआयटी कॉलेजवर छापा टाकण्यात आला. तीन कारमधून आलेल्या ईडीच्या दहाहून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी महत्त्वाची कागदपत्रे पडताळण्यात आली. त्याचप्रमाणे टी. बेगूरजवळील वैद्यकीय महाविद्यालय व हेग्गेरेजवळील वैद्यकीय महाविद्यालयावर छापा टाकून वैद्यकीय प्रवेशासंबंधीची कागदपत्रे पडताळण्यात आल्याचे समजते. गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांच्या मालकीच्या या तीन महाविद्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांच्या सिद्धार्थ शिक्षण संस्थांवर ईडीने छापे टाकण्यामागे इतर कोणत्यातरी प्रकरणाचा संबंध आहे की कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी छापा टाकण्यात आला, याविषयी ईडीकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच समजेल. छाप्याची माहिती मिळताच डॉ. परमेश्वर पत्नीसमवेत तातडीने बेंगळूरहून तुमकुरात दाखल झाले. हेग्गेरे येथील वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना आपल्या शिक्षण संस्थेची आवश्यक माहिती दिल्याचे समजते.

2019 मध्ये डॉ. जी. परमेश्वर यांच्या सिद्धार्थ शिक्षण संस्थेवर प्राप्तिकर विभागाचे छापा टाकला होता. तेव्हा वैद्यकीय जागांचे बेकायदेशीरपणे वाटप केल्याच्या आरोपावरून छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी परमेश्वर यांचा स्वीय साहाय्यक रमेश याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्याने बेंगळूरच्या ज्ञानभारती कॅम्पसमध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून रमेश याने आत्महत्या केल्याचा ठपका तत्कालिन विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली होती. त्यानंतर छाप्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. 2019 च्या छाप्यानंतर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी ईडीला माहिती दिली होती.

Advertisement
Tags :

.