दक्षिण गोव्यात ईडीचे छापे
तब्बल 30 लाखांच्या रोख रकमेसह अनेक वस्तू जप्त
पणजी : नोएडा उत्तर प्रदेश येथील पोलिसस्थानकात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली नोंद झालेल्या तक्रारीच्या आधारे अंमलबजावणी संचालनालय (ईडी), लखनौ विभाग पथकाने दिल्ली, नोएडा आणि गोव्यातील 9 ठिकाणी छापे मारले. ही कारवाई भासिन इन्फोटेक अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., ग्रँड विनेझिया कमर्शियल टॉवर्स प्रा. लि. आणि त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या ठिकाणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा प्रमुख संशयित सतिंदर सिंग भासिन हा भासिन इन्फोटेक कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कंपनीने ग्रँड विनेझिया कमर्शियल कॉम्प्लेक्स नावाने एक रिअल इस्टेट प्रकल्प सुरू केला होता. प्रकल्पाची खोटी जाहिरात आणि खोटी आश्वासने देऊन गुंतवणूकदारांना फसवण्यात आले आहे. गुंतवणूकदारांकडून पैसे घेतल्यानंतर गुंतवणूकदारांना मालमत्तेचा ताबा देण्यात आला नाही. दक्षिण गोव्यात केलेल्या धडक छापेमारीत ईडीने 30 लाख ऊपयांची रोख रक्कम, विविध बँक लॉकरच्या चाव्या, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच काही बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग कायदा 2002 (पीएमएलए) अंतर्गत करण्यात आली आहे.