हरियाणा-पंजाबमध्ये ईडीचे छापे
एनएचपीसी’च्या माजी अधिकाऱ्याची मालमत्ता जप्त
वृत्तसंस्था/ चंदीगड
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी हरियाणा आणि पंजाबमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली. छापेमारीत ईडीने नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनचे (एनएचपीसी) माजी मुख्य महाव्यवस्थापक हरजीतसिंग पुरी आणि त्यांची पत्नी अरविंदरजीत कौर यांची 47 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. याप्रकरणी सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये एफआयआर नोंदवला आहे. एफआयआरच्या आधारे केंद्रीय एजन्सीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पुरी यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. या मालमत्तांची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरजीतसिंग पुरी ‘एनएचपीसी’चे महाव्यवस्थापक म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. त्यांनी आपल्या उत्पन्नापेक्षा बेकायदेशीर संपत्ती मिळवली होती. जप्त केलेल्या मालमत्ता हरियाणातील फरिदाबाद आणि पंजाबमधील लुधियाना येथील असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हरजीतसिंग पुरी आणि त्यांच्या पत्नीच्या एकूण 4 स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. याची किंमत 47 लाख रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. पुरी यांनी आपल्या अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर करत आर्थिक लाभ उठवल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी ईडी पुढील कारवाई करत आहे.