पाच राज्यांमध्ये ईडीकडून छापे
वृत्तसंस्था/हैदराबाद
ईडीने गुरुवारी 3,500 कोटी रुपयांच्या आंध्रप्रदेश मद्य घोटाळ्यासह अन्य एका प्रकरणात राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि दिल्ली-एनसीआरमध्ये सुमारे 20 ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून त्यामध्ये अनेक कंपन्या आणि ज्वेलर्सच्या मालमत्तांचा समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सुरुवातीला आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मनी लाँड्रिंगच्या दोन प्रकरणांमध्ये छापे टाकले. पहिल्या प्रकरणात तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या सहकारी शशिकला यांचा समावेश आहे. शशिकला यांच्यावर 200 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक आणि बेनामी मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणात आधीच एफआयआर दाखल केला आहे. ईडीने चेन्नई आणि हैदराबादमधील शशिकला आणि तिच्या सहकाऱ्यांच्या 10 ठिकाणच्या मालमत्तांवर छापे टाकले. दुसरा खटला 3,500 कोटी रुपयांच्या आंध्रप्रदेश मद्य घोटाळ्याशी संबंधित असून त्यामध्ये बनावट बिलांद्वारे लाच दिल्याचा आरोप आहे.