For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थानात काँग्रेस नेत्याच्या निवासस्थानावर ईडीचा छापा

06:19 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
राजस्थानात काँग्रेस नेत्याच्या निवासस्थानावर ईडीचा छापा
Advertisement

पीएसीएल घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडवून देत ईडीने मंगळवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांच्या जयपूर येथील निवासस्थानी छापा टाकला आहे. 2850 कोटी रुपयांच्या पीएसीएल घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. पीएसीएल घोटाळ्याच्या रकमेतील सुमारे 30 कोटी रुपये खाचरियावास यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी ईडीच्या पथकांनी त्यांच्या ठिकाणावर झडती घेतली आहे.

Advertisement

पीएसीएल कंपनीवर सेबीने 22 ऑगस्ट 2014 रोजी अवैध गुंतवणूक योजना चालविण्याच्या आरोपात कारवाई केली होती. यानंतर कंपनीच्या विरोधात देशभरात गुन्हे नोंद झाले होते. सेबीच्या अहवालानुसार पीएसीएलने देशभरात सुमारे 5.85 कोटी लोकांकडून 49,100 कोटी रुपयांची रक्कम जमविली होती, यात राजस्थानच्या 28 लाख गुंतवणुकदारांकडून जमविण्यात आलेली 2850 कोटी रुपयांची रक्कम सामील होती.

पीएसीएलच्या संपत्ती जप्त करत गुंतवणुकदारांना त्यांची रक्कम परत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 2 फेब्रुवारी 2016 रोजी सेवानिवृत्त सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. सेबीनुसार कंपनीकडे 1.86 लाख कोटी रुपयांच्या संपत्ती असून त्या गुंतवणुकदारांच्या रकमेपेक्षा सुमारे 4 पट अधिक मूल्याच्या आहेत. या घोटाळ्याप्रकरणी सर्वात पहिला गुन्हा 2011 मध्ये जयपूरमध्ये नोंदविला गेला होता. यानंतर बिहार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आसाम, कर्नाटक, पंजाब, आंध्रप्रदेश, छत्तीसगड समवेत अनेक राज्यांमध्ये गुन्हे नोंद झाले होते.

Advertisement

.